
<< श्रीप्रसाद पद्माकर मालाडकर
ज्येष्ठ प्रसिद्धी माध्यम तज्ञ
मार्कोनीच्या संशोधनाने 23 फेब्रुवारी 1920 रोजी तेव्हाचा आधुनिक आकाशवाणी संच अस्तित्वात आला. भारतात 23 जुलै 1927 रोजी व्हॉईसरॉय लॉड आयर्विन यांच्या हस्ते उद्घाटन होऊन आकाशवाणी मुंबई केंद्राचे रीतसर प्रसारण आता विदेश टपाल मुख्यालय असलेल्या इमारतीत सुरू झाले. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या आद्य मराठी निवेदिका कमलिनी विजयकर, हिंदी-इंग्रजी आद्य निवेदक विजय, तर किशोर दुबे आहेत. आद्य क्रीडा समालोचक बॉबी तल्यारखान आहेत. 1894 पासून आजपर्यंत आकाशवाणी संचाच्या आकारात, रूपरंगात, प्रसारण पद्धतीत जे बदल झाले ते आकाशवाणी स्वीकारत गेली. आकाशवाणी मुंबई केंद्राचे आद्य ध्वनिमुद्रण सुविधा जनक नागनाथ एकनाथ खोटे यांच्यामुळे पूर्वनियोजित कार्यक्रम काही दिवस किंवा काही महिने आधी ध्वनिमुद्रित करून मग नियोजित दिवशी प्रसारित केले जातात.
आकाशवाणीची शिवरंजनी रागातली संकेत धून वॉल्टर कॉफमन यांनी निर्माण केली. ते आकाशवाणी मुंबई केंद्रात पाश्चात्त्य संगीत विभागात संगीतकार होते. माहिती, ज्ञान, मनोरंजन ही आकाशवाणीची तीन महत्त्वाची मूलतत्त्वे आहेत. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे आकाशवाणीचे ब्रीदवाक्य आहे. 1 एप्रिल 1930 रोजी शासकीय भारतीय राज्य प्रसारण सेवा कार्यान्वित झाली. दिनांक 19 जानेवारी 1936 रोजी आकाशवाणीचं पहिलं बातमीपत्र प्रसारित झालं. 23 जुलै 2026 पासून आकाशवाणीचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे. 1 ऑक्टोबर 1939 रोजी पश्तू भाषेत बहिर्देशीय प्रसारण सेवा सुरू झाली. 20 जुलै 1952 रोजी राष्ट्रीय संगीत सभेचा आरंभ झाला. ऑक्टोबर 1945 मध्ये पहिले आकाशवाणी संगीत संमेलन सुरू झाले. विविध भारती सेवा 3 ऑक्टोबर 1957 रोजी सुरू झाली. सन 1974 पासून आकाशवाणी वार्षिक पुरस्कारांची सुरुवात झाली. 2 मे 1996 पासून माहिती संजाल इंटरनेटद्वारे थेट माहिती सेवा कार्यान्वित झाली. सन 1997 मध्ये प्रसार भारती महामंडळ अस्तित्वात आले.
आकाशवाणी प्रसारणात ज्ञानासह मनोरंजनाद्वारे आधी ग्रामीण श्रोत्यांसाठी गावकरी मंडळ, त्यात कृषीविषयक माहिती दिली जात होती, तेव्हा त्याचा भाग बातम्या असायच्या. जीवनचंद्र वणीकर हे त्याचे निर्माते होते. कुसुम आपटे म्हणजे वृत्त निवेदिका कुसुम रानडे या आकाशवाणी सेवेत यायच्या आधी या कार्यक्रमात छोटे संवाद, गाणी यात सहभागी व्हायच्या. आकाशवाणी मुंबई केंद्राचा वृत्त विभाग 2 ऑक्टोबर 1954 रोजी सुरू झाला, सुरुवातीच्या काळात राम मराठे, केशव काटेकर, शं. ना. जोशी, दिगंबर स्वादिया, हरीश कांबळे वृत्त संपादक होते. मोहन चांडक सहसंचालक वृत्त होते. श्रोत्यांची सर्व स्तरांची अभिरुची लक्षात घेऊन लहान मुलांसाठी गंमत जंमत, बालदरबार असे कार्यक्रम केले गेले. त्यांचे निर्माते माधव कुलकर्णी, नाट्य विभागाचे आनंदराव ढोलेकर, मोतीराम गजानन रांगणेकर, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, पुरुषोत्तम दारव्हेकर होते. स्त्रियांसाठी वनिता मंडळ, कामगारांसाठी कामगार सभा, संगीत, साहित्य, कृषी, क्रीडा, ज्येष्ठ नागरिक, विज्ञान, कुटुंब कल्याण विभागांतर्गत आरोग्यविषयक साप्ताहिक स्वास्थ्य सेवा असे अनेक कार्यक्रम कालांतराने अस्तित्वात आले. विज्ञान दृष्टी, निसर्ग संपदा, जीवन सौरभ, संजीवन, मानवी उक्रांती, स्वर बहार अशा अनेक मालिका प्रसारित झाल्या आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राने अनेक महान गायक, कलावंतांना व्यासपीठ दिले. ध्वनिमुद्रणाद्वारे त्यांची कला सदाबहार ठेवण्याचे कार्य आकाशवाणीनं केलं. दिवंगत कलाकारांचे कार्य ध्वनिमुद्रणाद्वारे कालातीत, सदाबहार ठेवले आहे. ‘स्वर बहार’ मालिकेने आजच्या पुनर्भेसळ संगीताच्या काळात आपले भारतीय संगीत किती महान आहे, याचा प्रत्यय नवीन पिढीला आला. दिवसामागून दिवस आणि ऋतूमागून ऋतू येत जात राहतील, पण आकाशवाणी कालातीत, सदाबहार राहील.































































