
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘आंदोलकांसोबत सरकारनं जे काही केलं ते भ्याडपणाचं लक्षण आहे. मोदी सरकार पुरतं घाबरलं आहे. मानसिकदृष्टय़ा साफ कोसळलं आहे,’ अशी टीका करत त्यांनी तीन मागण्या केल्या.
सीजेपीच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीहल्ला आणि त्यानंतर काँग्रेस खासदारांचे आंदोलन चिरडल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. मोदी सरकारने देशाची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकली आहे. शिक्षण घेणेही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. मागच्या दहा वर्षांत देशात 152 वेळा परीक्षांचे पेपर फुटले आहेत. यासाठी कोणालाही जबाबदार धरण्यात आलेले नाही. साडेसात कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सरकारच्या या कारभाराचा फटका बसला आहे, असा दावा राहुल यांनी केला.
पंतप्रधानांच्या घराबाहेरील आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या मारहाणीबद्दल विचारले असता माझ्यासाठी ती क्षुल्लक गोष्ट असल्याचे राहुल गांधी म्हणाले. ‘विरोधी पक्षनेता म्हणून देशातील जनतेच्या इच्छा, आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणे हे माझे काम आहे. विद्यार्थी, शेतकरी आणि तरुणांचा आवाज उठवत राहणे हे माझे काम आहे. जिथे कुठे दुःख, वेदना आहेत, त्याकडे व्यवस्थेचे लक्ष वेधणे हे माझे काम आहे. मला झालेली मारहाण ही त्या कामाची खूप छोटी किंमत आहे. ती काही फार मोठी किंमत नाही. तो माझा मोठा सन्मान आहे. त्यासाठी दोन-तीन ठोसे बसले तर हरकत नाही. लोकांचे काम होत असेल तर असे आणखी ठोसे आनंदाने खाण्याची माझी तयारी आहे,’ असे राहुल गांधी म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तडजोड होणार नाही!
संसदेचे कामकाज चालणार का आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर तुम्ही ठाम राहणार का या प्रश्नांवर राहुल यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ‘संसद चालणार की नाही हे विरोधी पक्षांच्या उद्याच्या बैठकीत ठरेल. मी इथे काही सांगणे विरोधी पक्षाचा अनादर करण्यासारखे होईल. त्यावर सर्व विरोधक मिळून निर्णय घेतील, मात्र, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काही तडजोड होणार नाही. कारण त्यांच्या मागण्या अत्यंत रास्त आहेत. त्या आमच्या मागण्या नाहीत,’ असे राहुल म्हणाले.
पोलिसांनी माझ्या कानात सांगितले, हे सरकार हटवा!
लोककल्याण मार्गावर आंदोलन करताना पोलिसांनी राहुल गांधी यांनी पकडून नेले. त्यावेळचा अनुभव विचारला असता राहुल गांधी म्हणाले, ‘पोलिसांनी मला खेचत नेले हे खरे आहे. पण नेताना त्यांनी माझ्या कानात सांगितले की हे सरकार घालवा. त्यातला एक राजस्थानचा आणि एक हरयाणाचा होता. ते म्हणत होते, आम्ही फक्त युनिफॉर्म घातलाय. जे काही झालं ते पोलिसांनाही आवडलेलं नाही. मुलांवर अन्याय झालाय अशी पोलिसांचीही भावना आहे. पण त्या बिचाऱ्यांना आदेश पाळावे लागतात.’
1 धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
2 विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई
3 मोदी, विद्यार्थ्यांची माफी मागा
सरकार माझ्याशी कसं वागतं हा मुद्दाच नाही. मला ठोसे खाण्याची सवय आहे. त्याची चिंता नाही. विद्यार्थी, शेतकरी व तरुणांचा आवाज बनणं हे माझं काम आहे. त्यांच्यासाठी आणखी ठोसे खायला तयार आहे. – राहुल गांधी





























































