आंदोलकांचे रक्त सांडले, पण ते झुकले नाहीत; विद्यार्थी आंदोलनाची जागतिक माध्यमांकडून दखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी दिल्लीतील ‘जंतर मंतर’वर विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल जगातील आघाडीच्या प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात आंदोलक विद्यार्थ्यांचे रक्त सांडले, परंतु विद्यार्थी मागे हटले नाहीत. ते सरकारपुढे झुकले नाहीत, अशा शब्दांत ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने या आंदोलनाची दखल घेतली आहे.

‘न्यूयॉर्क टाईम्स’, ‘द गार्डियन’सह अनेक आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांनी या घडामोडीला प्रमुखतेने कव्हर केले आहे. अमेरिकन वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने आपल्या अहवालात लिहिले आहे की, शिक्षण व्यवस्था आणि भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांवरून आंदोलन करणारे हजारो तरुण पोलिसांच्या कारवाईनंतरही मागे हटले नाहीत. ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ने आपल्या अहवालात लिहिले की, दिल्लीतील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी सुरू झालेले युवा आंदोलन पोलिसांच्या कारवाईनंतरही थांबताना दिसत नाहीये. वृत्तपत्रानुसार, सोमवारी झालेल्या संघर्षाच्या दुसऱ्या दिवशीही हजारो आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून होते आणि आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले, तर ‘अल जझीरा’ या जगप्रसिद्ध वृत्तपत्राने लिहिले की, संसद मार्चदरम्यान पोलिसांच्या कारवाईनंतरही विद्यार्थी माघार घेण्यास तयार नाहीत.