डोक्यात हवा गेलीय, मोदी सरकार मस्तीत, या मस्तीविरोधात देश पेटून उठलाय! उद्धव ठाकरे यांचा हल्ला… भाजप सरकार म्हणजे रावण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘स्वतःच्या भवितव्यासाठी आंदोलन करणाऱ्या लहान मुलींवर लाठीहल्ला करता, त्यांचे कपडे फाडून मारहाण करता. हेच तुमचे हिंदुत्व आहे काय? ही हिंदू संस्कृती असू शकत नाही. ही रावण संस्कृती आहे. भाजप सरकार रावण झाले आहे. त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. ते मस्तीत वावरत आहेत. या मस्तीविरोधात देश पेटून उठला असून त्यांची हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही,’ असा जोरदार हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारवर चढवला.

पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री जंतर मंतरवर जाऊन अभिजीत दीपके यांच्यासह सर्व आंदोलकांची भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या ‘15 सफदरजंग लेन’ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार आसूड ओढले.

‘कोणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याशी संवाद साधणे हे सरकारचे कर्तव्य आहे. आंदोलकांचे म्हणणे काय आहे हे जाणून घ्यायला हवे. त्यांचा गैरसमज झाला असेल तो दूर करणे हे सरकारचे काम आहे. उपोषण करण्याआधीही सोनम वांगचुक आणि अभिजीत दिल्लीत आले होते. पहिल्या दिवशीच सरकारने यांच्याशी चर्चा केली असती तर हे प्रकरण इतके वाढले नसते,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. वांगचुक यांचे वडील लडाखमध्ये उपोषणाला बसले असताना इंदिरा गांधी स्वतः त्यांना जाऊन भेटल्या होत्या. अण्णा हजारे यांनी उपोषण केले त्यावेळी देखील सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख त्यांच्याशी चर्चेला गेले होते, याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले.

अकार्यक्षम मंत्र्याचा राजीनामा मुलं मागत असतील तर त्यात चुकीचं काय आहे. तो त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. एक व्यक्ती की देशाचे भविष्य, यात एकाची निवड सरकारला करावी लागेल. भाग्यविधात्यांचं भाग्यच तुम्ही चिरडून टाकणार असाल तर लोक ऐकणार नाहीत. देशातील तरुणांची तुम्ही झुरळ म्हणून निर्भर्त्सना करता हे सहनशीलतेच्या पलीकडे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. या मुलांना कोणीतरी आधार देण्याची गरज आहे. आज आधार दिला तर हे देशाचे भावी आधारस्तंभ देश वाचवू शकतील. पण हा आधारस्तंभ मोडून कोणी हुकूमशाही लादणार असाल तर ते गप्प बसणार नाहीत, असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले. यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार नितीन देशमुख उपस्थित होते.

कोणी आंदोलन केले की यांच्यात पाकिस्तानी घुसलेत, यांना अराजक माजवायचे आहे, असे भाजपकडून सांगितले जाते. बदनामी करण्यात यांचा हातखंडा आहे. मात्र ज्या पद्धतीने हे सत्ताधारी वागत आहे, ते पाहता त्यांनाच देशात अराजक माजवायचे आहे की काय आणि त्यांच्यातच कोणी पाकिस्तानी घुसलेत की काय, असा प्रश्न पडतो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. पाकिस्तानशी चर्चेची दारे उघडी ठेवायला हवीत, असे आरएसएसचे लोक म्हणतात, मग देशातले विद्यार्थी स्वतः तुमच्या दारात आले आहेत, तुमच्याकडून काही अपेक्षा बाळगून आहेत, त्यांच्याशी बोलण्यात सरकारला कमीपणा का वाटतोय? जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे ना? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

तुझे-माझे करण्याची वेळ नाही!

मुंबईत शिवसेनेने केलेल्या आंदोलनावेळी 300 हून अधिक जणांना डिजिटल नोटीस बजावण्यात आली आहे. डिजिटल ऍरेस्ट बेकायदेशीर आहे, तर मग डिजिटल नोटीस कसली पाठवता, अशी विचारणाही त्यांनी केली. आदित्य ठाकरे व युवासेना या आंदोलकांना आवश्यक ती मदत करत आहे, असेही त्यांनी सांगितले. काँगेसच्या आंदोलनावर आम आदमी पक्षाने केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, तुझे-माझे करण्याची ही वेळ नाही. आपसातले मतभेद विसरून सगळ्यांनीच एकजुटीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. सरकारने विद्यार्थ्यांनी बोलले पाहिजे, तसे विरोधकांनीही आपसात बोलले पाहिजे, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला.

केजरीवालांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये देशातील सध्याच्या घडामोडींवर चर्चा झाली. यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत व आपचे खासदार संजय सिंह उपस्थित होते.

मुलांचं ऐकण्यातच सरकारचा फायदा!

‘सरकारने मुलांशी बोलले पाहिजे. त्यांना रोखण्याचा जितका प्रयत्न कराल, तितके आंदोलन मोठे होईल. वांगचुक यांना उचलून नेल्यानंतर आंदोलन थांबेल असे सरकारला वाटले होते, पण ते आणखी तीव्र झाले. संसदेवर निघालेला मोर्चा मोडून काढला. लोकांची डोकी फोडली. अनेक लोक जखमी झाले. इतके होऊनही लोक घाबरलेले नाहीत. आंदोलकांची संख्या आणखी वाढली. मेट्रो स्टेशन बंद करूनही काही उपयोग होणार नाही. लोक पायी चालत येतील. सरकारने मुलांचे ऐकावे. तेच त्यांच्या फायद्याचे आहे,’ असे आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. नीट प्रकरणी कारवाई सुरू असल्याचा सरकारचा दावा केजरीवाल यांनी खोडून काढला. ’2024 मध्येही नीटचा पेपर लीक झाला होता. त्या प्रकरणातील सूत्रधाराच्या विरोधात मोदी सरकारने वेळेवर आरोपपत्र दाखल केले नाही. त्यामुळे त्याला जामीन मिळाला आणि हे कारवाईचे दावे करत आहेत. जे चोर आहेत, त्यांना जामीन मिळण्यास सरकार मदत करत आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे,’ अशी टीका केजरीवाल यांनी केली.

संवाद हा लोकशाहीचा भाग आहे. तो नसेल तर ती हुकूमशाही होते. स्वतःची ‘मन की बात’ लोकांना बळजबरीनं ऐकवायची आणि ‘जन की बात’ ऐकायची नाही ही लोकशाही नाही.’ – उद्धव ठाकरे

फडणवीसांना शुभेच्छा पण…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे, तुम्ही शुभेच्छा देणार का, असे पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, ‘फडणवीस यांचा वाढदिवस आहे ही चांगली गोष्ट आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण माझ्या शुभेच्छांमध्ये पाकिस्तानचा हात नाही.’

लोकांना रस्त्यावर यायचंय, त्यांना अडवू नका!

वंचित बहुजन आघाडीच्या बंदला शिवसेनेचा पाठिंबा आहे का, असे विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, लोकांना रस्त्यावर यायचं आहे. त्यापासून त्यांना कोणी अडवू नये. हा असंतोष अचानक उफाळून आलेला नाही. गेल्या 12 वर्षांत साठलेला हा असंतोष आहे, तो आता उफाळून येतोय. त्यामुळे लोकांना रस्त्यावर येऊ द्या!