मोबाईल, कॅमेरा चष्म्यांना बंदी, महासभेचे रिल्स बनवणाऱ्यांना दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वाटेल त्या ठिकाणी रिल्स बनवणारे महाभाग आता थेट ठाणे महापालिकेच्या महासभेपर्यंत येऊन पोहोचले आहेत. अशा रिल्सबाजांना महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दणका दिला असून यापुढे महासभेत मोबाईल आणि कॅमेरा असलेल्या चष्म्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महासभेत सुरक्षादेखील वाढवली असून प्रत्येकाची कसून तपासणी केल्यानंतरच सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे.

ठाणे महापालिकेच्या महासभेत असलेल्या प्रेक्षक गॅलरीत पत्रकार तसेच नागरिकांना प्रवेश दिला जातो. अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्तेदेखील येतात. मंगळवारी महासभा सुरू असताना काही रिलबाज मोबाईल व चष्मा कॅमेऱ्याच्या माध्यमातून कामकाजाचे रिल्स करत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नको ती गाणी टाकून तयार केलेले रिल्स आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित केले जात असल्याचेही काही नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेच्या निदर्शनास आणून दिले. याची गंभीर दखल घेत महापौरांनी प्रेक्षक गॅलरीत मोबाईल व कॅमेरा चष्म्यांना बंदी घालण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

चुकीची माहिती प्रसारित

काहीवेळेस अर्धवट व्हिडीओ करून चुकीची माहिती प्रसारित केली जाते. सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यास परवानगी नसताना अशा प्रकारे रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणे योग्य नसल्याचे मत अनेक नगरसेवकांनी व्यक्त केले. ठाणेकरांना प्रेक्षक गॅलरीत सभागृहाचे कामकाज पाहण्याची मुभा असली तरी यापुढे कोणालाही मोबाईल तसेच कॅमेरा असणारा चष्मा आणता येणार नाही.