
टीम इंडिया सध्या झिम्बाब्वेच्या दौऱयावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका गुरुवारी सुरू होत आहे. पण झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने मालिकेपूर्वीच टीम इंडियाला खणखणीत इशाला दिला आहे. सिकंदर रझाचे म्हणणे आहे की, आमच्या संघाला हलक्यात घेता येणार नाही आणि या मालिकेत दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत.
सामना अटीतटीचा होणार
रझाचा विश्वास आहे की, टीम इंडियाला मजबूत मानले जात असले तरी, ही मालिका अटीतटीची होईल. रझा म्हणाला की, दोन्ही संघांना मालिका बरोबरीत आणण्याची संधी आहे, पण मला खात्री आहे की झिम्बाब्वे सातत्यपूर्ण आणि रोमांचक क्रिकेट खेळत आहे. मी खात्रीने सांगू शकतो की, ही मालिका खूपच रंजक होणार आहे.
उलटफेर करण्याची क्षमता
हिंदुस्थानी क्रिकेट संघ दिग्गज मानला जातो, पण झिम्बाब्वेला कमी लेखणे त्यांच्यासाठी घोडचूक ठरू शकते. या संघाने टीम इंडियाच्या मागील दौऱयातील पहिलाच सामना जिंकला होता. या वर्षी भारतात झालेल्या टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून झिम्बाब्वेने मोठा उलटफेर घडवला होता. हा संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत काहीही करू शकतो.
वैभव सूर्यवंशीवर असेल सर्वांचे लक्ष
संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आल्याने अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करणाऱया सूर्यवंशीवर पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष असेल. अभिषेक आणि सूर्यवंशी यांच्या हरारे स्पोर्ट्स क्लबशी गोड आठवणी जोडलेल्या आहेत. अभिषेकने याच मैदानावर पदार्पण केले होते आणि दुसऱयाच सामन्यात आपले पहिले टी-20 शतक झळकवले होते. सूर्यवंशीनेही 6 फेब्रुवारीला इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्ध ज्युनियर विश्वचषक अंतिम सामन्यात याच मैदानावर शतक झळकवले होते.





























































