
डॉ. विवेक बेळे लिखित आणि गिरीश कुलकर्णी दिग्दर्शित गाजलेले ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक आता नव्या संचासह पुन्हा रंगभूमीवर येत आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या या लोकप्रिय नाटकाने दोन पिढ्यांतील वैचारिक संघर्ष, बदलते नातेसंबंध आणि भावनिक गुंतागुंत यांचे प्रभावी चित्रण करून रसिकांची मने जिंकली होती. डॉ. मोहन आगाशे, संदेश कुलकर्णी आणि केतकी थत्ते यांच्या अभिनयाने त्यावेळी हे नाटक विशेष गाजले. त्यानंतर काही कारणांमुळे या नाटकाचे प्रयोग बंद झाले. याच कथानकावर आधारित सतीश राजवाडे दिग्दर्शित आणि नाना पाटेकर अभिनीत ‘आपला माणूस’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
सेवानिवृत्त गणित शिक्षक, त्यांचा मुलगा आणि सून यांच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या कथेत एका अनपेक्षित घटनेनंतर उलगडणारी नात्यांची खरी समीकरणे प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी आणि शेवटी अनपेक्षित रहस्यभेद करणारी होती. आता अजित भुरे यांच्या दिग्दर्शनाखाली येत्या ऑगस्टमध्ये हे नाटक नव्या रूपात रंगणार असून शरद पोंक्षे, सुयश टिळक आणि ‘ठरलं तर मग’ फेम प्रियांका तेंडोलकर यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात असणार आहेत. डॉ. बेळे यांच्या खुसखुशीत आणि तर्कशुद्ध लेखनशैलीमुळे या पुनरागमनाबद्दल नाट्यप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.



























































