
शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या सूत्रधारांना अटक करण्याच्या मागणीसाठी पूर्णेकर समर्थक आणि ठाणेकर रस्त्यावर उतरले आहेत. मंगळवारी रात्री पूर्णेकर समर्थकांनी घोडबंदर रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. प्रदीप पूर्णेकरांना न्याय द्या, सूत्रधारांना अटक करा, एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या आणि ठाणे भयमुक्त करा या मागण्यांसाठी गुरुवारी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात सर्वपक्षीयांचे महाआंदोलन होणार आहे. तत्पूर्वी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला असून ठाण्यातील शिंदेंचे मिंधे पोलीस दल बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्या खऱ्या हत्यारांना पकडण्यासाठी कालपासून शेकडो ठाणेकर रस्त्यावर उतरले आहेत. उद्या आदित्य ठाकरे, मी, अॅड. अनिल परब आणि मुंबईतून असंख्य शिवसैनिक ठाण्याला जाणार आहोत. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्याबाबतचे ठोस पुरावे प्रदीप पूर्णेकरांचे चिरंजीव राम पूर्णेकर यांनी समोर आणले आहेत. हत्येपूर्वी या सर्व आरोपींबरोर राजेंद्र शिंदे दिसत आहेत. त्यांना मार्गदर्शन करत आहेत. हा पुरावा दुसऱ्या कुणाबाबत असता तर त्याला अटक करून मोक्का लावला असता, असेही संजय राऊत म्हणाले.
ठाण्याचे पोलीस कुणाच्या दबावाखाली आहेत? एसआयटी कसली स्थापन करताय? आतापर्यंत किती खुनांमध्ये एसआयटी स्थापन झाली आणि एसआयटी काय करणार आहे? अशा सवालांच्या फैरी झाडत संजय राऊत म्हणाले की, ठाण्यातील पूर्ण पोलीस दल बरखास्त व्हायला पाहिजे. ठाण्याचे पोलीस शिंदेंचे मिंधे आहेत. पोलीस आयुक्तांपासून सगळे बरखास्त व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक झाली नाही तर ठाण्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांवर राहील, असेही संजय राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, एक तरुण मुलगा ज्याने आपला बाप गमावला तो न्याय मागण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यासमोर जात असेल तर पोलिसांना चोमडेपणा करण्याची गरज काय. ठाण्याच्या पालकमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन न्याय मागण्याचा अधिकार त्याला आहे. त्याला अटक करा असे पोलिसांना कुणी सांगितले? त्याच्या हातात शस्त्र होते का तो कुणाच्या घरात घुसणार होता? तो शिवीगाळ करत होता की दारू प्यायला होता? तो फक्त न्याय मागण्यासाठी चालला होता. ठाण्यातील पोलीस पालकमंत्र्यांची चाकरी करत असून त्याची यांना फार मोठी किंमत चुकवावी लागेल. पोलीस एक खून दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, खून केला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अमानुष आहे.
दरम्यान, 33 टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच मदत केली जाणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मी वर्षा बंगल्यावर 11 हजार पाठवतो, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करून दाखवावी. तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करत आहात का? 10-10 हजारांना मतं विकत घेतात, 50-50 कोटींना आमदार, खासदार विकत घेता आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना 5 हजार देता. ते सुद्धा नियम, अटी आणि कायदे लावून. ही शेतकऱ्यांची चेष्टा असून कालच मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या. शेतकरी सावकारी पाशात अडकला आहे. फायनान्स कंपन्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना टॉर्चर करत आहेत. मुख्यमंत्री फौजदारी गुन्हे दाखल करा असा आदेश देतात. पण ठाण्यात मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करा असा आदेश देत नाहीत.























































