
चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून विहान श्रीवास्तव या चिमुरड्यासह तिघांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी मनसेने आज आझाद मैदानात पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन केले. या प्रकरणी आयुक्तांनी दोन दिवसांत चौकशी करण्याचे आश्वासन दिले. निष्पक्ष चौकशीसाठी स्वतंत्र व तटस्थ समिती नेमून अहवाल तयार केला जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.
चिमुकल्याला न्याय मिळालाच पाहिजे !
उद्यान अधीक्षकांचे निलंबन करून या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करतानाच मनसे कार्यकर्त्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. हा अन्याय असाच सुरू राहिला तर अधिक तीव्र आंदोलन करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकार व महापालिका प्रशासनाला दिला. आझाद मैदानात आंदोलन होत असताना काही मनसैनिकांनी भायखळा येथील महापालिकेच्या उद्यान विभागावर मोर्चा काढत तिथे ठिय्या आंदोलन केले.





























































