
पोक्सोचा तपास करण्यात रत्नागिरीतील खेड पोलीस अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने हा तपास राज्य सीआयडीकडे सोपवला. हा तपास योग्य प्रकारे होत नसल्याचा आरोप करत याचिका दाखल झाली. न्या. वृषाली जोशी व न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. पीडितेचा जबाब पोलीस ठाण्यात नोंदवला गेला. या तपासात कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींचे पालन पोलिसांनी केले नाही.
पीडितेची ओळख व वास्तव्याचा पत्ता गुप्त ठेवण्यात आला नाही. तेव्हा हा तपास अन्य यंत्रणेकडे वर्ग करावा, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली. पोलिसांनी हा तपास गांभीर्याने केला नाही. नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली नाही. पोलिसांचे हे वर्तन धक्कादायक आहे, असे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने हा तपास खेड पोलिसांकडून काढून घेतला. राज्य सीआयडीला या तपासाची कागदपत्रे खेड पोलिसांनी द्यावीत, असे आदेश न्यायालयाने दिले.
महिला आयपीएस अधिकारी नसणे चिंताजनक
महिला आयपीएस अधिकारी नसल्याने वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकाकडे हा तपास सोपवला जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक यांनी न्यायालयात दिली. यावर न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. महिला आयपीएस अधिकारी नसणे ही बाब चिंताजनक आहे. यातील आरोपीवर आठ महिन्यांत दोन गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांचे हे स्पष्टीकरण न पटणारे आहे. अशा परिस्थितीत पारदर्शक तपास होऊ शकतो का, याबद्दल आम्हाला शंका आहे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.





























































