
भावी पिढीला कळावे म्हणून महानगरपालिकेच्या वतीने मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव, जलशुद्धीकरण केंद्रे येथे मुलांसाठी शैक्षणिक सहल आयोजित केली जाणार आहे. याबाबतची मागणी शिवसेनेने केली होती. त्याची दखल घेत महापालिकेतर्फे विद्यार्थ्यांसाठी मुंबई जलदर्शन शैक्षणिक सहली काढण्यात येणार आहेत.
मुंबई पालिकेमार्फत मुंबईत असलेल्या विहार व तुळशी तसेच मुंबईपासून 100 ते 175 कि.मी. अंतरावर असलेल्या तानसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा या तलावांतून पाणीपुरवठा होतो. तलावातून जलशुद्धीकरण केलेले पाणी भांडुप संकुल व येवई येथील महासंतुलन जलाशयांमध्ये साठवले जाते. अत्याधुनिक प्रक्रियेद्वारे पाण्याचे शुद्धीकरण झाल्यानंतर विस्तारीत जलवाहिनी जाळ्यांद्वारे दररोज 4100 दशलक्ष लिटर्स इतका शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येतो. नव्या पिढीला ही पाणीपुरवठा व्यवस्था, जलशुद्धीकरण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहता यावी, यासाठी त्या ठिकाणी शालेय सहली आयोजित करण्याबाबत ठरावाची सूचना शिवसेनेच्या नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी मांडली होती. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही सूचना मंजूर झाली.
मुलांमध्ये जलसंवर्धन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करणे काळाची गरज आहे. त्यासाठी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था आणि जलशुद्धीकरण प्रक्रिया तसेच जलस्रोतांची माहिती करून देणे आवश्यक आहे, असे मत सोनम जामसुतकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे मांडले.






























































