तीन वर्षांनी कुटुंबीयांशी झाली भेट एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीन वर्षांपूर्वी जुहू चौपाटी येथे बेवारसपणे फिरताना आढळलेल्या मुलाला एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या पालकाची भेट घडवून आणली. एमआयडीसी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तीन वर्षांपूर्वी जुहू चौपाटीवर तो मुलगा कुटुंबीयांसोबत आला होता. कुटुंबीयांची नजर चुकवून तो दूर गेला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. तेव्हा जुहू पोलिसांना चौपाटीवर तो मुलगा बेवारसपणे फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्याला तो कुठे राहतो हे सांगता येत नव्हते. त्या मुलाला अंधेरी येथील एका अनाथ आश्रमात ठेवले होते. जुहू पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक वाघ यांनी त्या मुलाच्या पालकांचा शोध घेतला. मात्र त्याचे पालक मिळून आले नव्हते. त्यानंतर तो मुलगा कोणालाही न सांगता अनाथ आश्रमातून निघून गेला होता. त्या मुलाच्या पालकांविषयी माहिती नसल्याने त्या मुलाचा शोध घेणे कठीण झाले होते. त्या मुलाचा शोध घेण्याचे आदेश पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिले.

वरिष्ठ निरीक्षक घनशाम नायर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सागर हुजरे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. तपास पथकाने राज्यातील आणि रेल्वे पोलीस ठाण्यातील २०२३ मध्ये अपहरण किंवा बेपत्ता झालेल्या मुलांची माहिती गोळा केली. तसेच मिसिंग पर्सन्स सर्च सेंटर आणि चाईल्ड हेल्पलाईनकडून देखील माहिती मिळवली. पोलिसांनी मुंबई शहर आणि उपनगर येथील बालगृह, सुधारगृह येथे जाऊन चौकशी केली. तेव्हा एका बालगृहात त्या मुलाशी साधर्म्य असलेला फोटो मिळाला. पोलिसांनी त्या केंद्रात जाऊन चौकशी केली. तेव्हा त्या मुलाचे नाव समजले. त्याचे आईवडील मालवणी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक मालवणी येथे गेले. तेव्हा त्या मुलाच्या आईवडिलांनी त्या मुलाचा फोटो ओळखला. तो तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झाल्याचे पोलिसांना सांगितले. तीन वर्षांनंतर पोलिसांनी मुलाची त्याच्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणली.