वाढवण बंदरविरोधी आंदोलन; 119 गावकऱ्यांची धरपकड, 14 जणांवर गुन्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढवण बंदराच्या ग्रीनफील्ड महामार्गाच्या कामाविरोधात डहाणू-चिंचणी बोईसर कोस्टल मार्गावर चार तास रास्ता रोको करणाऱ्या ११९ गावकऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे. यातील १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारच्या या झुंडशाहीविरोधात संपूर्ण पालघर जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून या सर्वांवरील गुन्हे बिनशर्त मागे घेण्याची मागणी भूमिपुत्रांनी केली आहे.

प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाच्या भरावासाठी मंगळवारी १२ डंपरमधून दगड-मातीचा भराव आणण्यात आला होता. हा सर्व प्रकार समजताच स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, मच्छीमार तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी डहाणू तालुक्यातील वरोर नाका येथे धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर डहाणू-चिंचणी-बोईसर कोस्टल मार्गावर चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलनकर्त्यांना अक्षरशः फरफटत पोलीस व्हॅनमध्ये कोंबले. जवळपास ११९ आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यातील ७१ जणांवर बोईसर तर ४८ जणांना डहाणू येथे नेण्यात आले असून १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 … तर तीव्र आंदोलन करू

भूमिपुत्रांनी केलेल्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने दिला आहे.