
दिल्लीतील जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानूष अत्याचाराविरोधात देशभरात संतापची लाट पसरली आहे. तरूण मुलं, मुली, महिलांवर लाठीहल्ला केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे अनेक आंदोलक गंभीररीत्या जखमी झाले. यावरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ही भाजपा आहे की ब्रिटीश जनता पार्टी, कारण ब्रिटीशांपेक्षा जास्त अत्याचार भाजप देशातील तरूणांवर करत असल्याची टीका त्यांनी केली. याच दडपशाही विरोधात 26 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते सिद्धिविनायक मंदिरा असा ‘तिरंगा मोर्चा’ निघणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, गेल्या 10 दिवसांपासून मुंबईत जात, पात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन देशातील तरुणांसाठी हे आंदोलन सुरू आहे. “जिथे ठाकरे आहेत तिथे आम्ही सुरक्षित आहोत, आम्हाला कोणी अटक करणार नाही, असा विश्वास आंदोलकांमध्ये निर्माण झाल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 20 जुलैला संसदेवर निघालेल्या मोर्च्यांत शाळेच्या विद्यार्थ्यांपासून कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत तसेच महिलांवर लाठीचार्ज केला गेला, इलेक्ट्रीक टेजर्स वापरण्यात आले, काही ठिकाणी लाठ्यांना खिळे लावण्यात आले होते. मात्र या सगळ्या सरकारी अत्याचाराविरोधात आता या देशाचा तरूण रस्त्यावर उतरला आहे आणि तो मागे हटायला तयार नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
गेल्या अनेक दिवसांपासून हे सगळे तरूण त्यांच्या भवितव्यासाठी आणि त्यांच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आम्ही म्हणालो होतो की, 24 जुलैला सगळ्यांनी शिवतीर्थावर सामुहिक राष्ट्रगीतासाठी जमावं. पण यासंदर्भात अनेक तरूण तरूणींचे आम्हाला मेसेज केले. या मोर्चासाठी आम्ही मुंबईबाहेरून येणार आहोत. त्यामुळे आमच्यासाठी शनिवार, रविवार हा सुट्टीचा दिवस योग्य असेल. त्यामुळे 24 तारखेला होणारा मोर्चा हा 26 तारखेला सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सगळ्यांनी एकत्र यावं. आणि नंतर हा मोर्चा सिद्धिविनायकच्या दिशेने जाईल. या मोर्चाच्या माध्यामातून संपूर्ण देशाला संदेश देऊ. या मोर्चात कोणत्याही पक्षाचे झेंडे किंवा बॅनर नसतील. असेल कर फक्त तिरंगा. देशभक्त, हिंदुस्थानप्रेमी सगळे नागरीक या मोर्चात सामील व्हा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
दिल्ली असो किंवा इतर ठिकाणी असो तेथील आंदोलनकर्ते शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. त्यामुळे शासनाने आणि पोलिसांनी याला हिंसक वळण देऊ नये. कारण जर तस झालं शासनाला ते भारी पडेल. देशात जर अशा घटना घडणार असतील तर या देशामध्ये पोलीस प्रोटोकॉल येणं गरजेचे असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांच्या आंदोलनाचा दाखला देत आदित्य ठाकरे म्हणाले की, ट्रम्प यांच्या विरोधात जी आंदोलन होतात तिथे कुठेही असा भयानक लाठीचार किंवा टिअर गॅस किंवा पेलेट गन्सचा वापर होत नाही. जर आपल देश लोकतांत्रिक असता तर हे प्रकार घडले नसते. पण हे लोक लोकतंत्र्याच्याही पुढे गेले आहेत आणि हुकुमशाही आली आहे. त्यामुळे जे कोणी अधिकारी जोरजबरदस्ती करत असतील तर ते चालणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.
पोलिसांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना इशारा देताना ते म्हणाले, “जर्मनीमध्ये नाझी साम्राज्य संपल्यानंतर ‘न्यूरेंबर्ग ट्रायल्स’ (Nuremberg Trials) झाल्या होत्या. हुकूमशहा निघून गेल्यानंतर ज्या अधिकाऱ्यांनी जनतेवर जुलमी अत्याचार केले होते, त्यांना न्यूरेंबर्ग ट्रायल्स अंतर्गत फाशी देण्यात आली होती. आज जुलमी वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांनी हे न्यूरेंबर्ग ट्रायल्स काय होते ते वाचून घ्यावे.
आदित्य ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका करताना म्हटले की, “या सरकारमध्ये एक देशद्रोही आणि अदृश्य ताकद बसलेली आहे, जी स्वतःच्याच देशातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी आंदोलन करू देत नाही. बाहेरून येत असलेल्या फंडिंगमुळेच सरकार देशवासीयांचा आवाज दाबून त्यांच्यावर लाठ्या चालवत आहेत. भाजपने आधी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या घरी ईडी (ED) पाठवून राम मंदिराच्या डोनेशनच्या पैशांवर बोलावं. भाजप हा देशद्रोही, युवाद्रोही आणि शिक्षणद्रोही पक्ष आहे. त्यांच्या अनेक नेत्यांचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही आणि ज्यांचा आहे त्यांची मुले परदेशात शिकतात, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
एकच राजकीय संघटना आहे जिचा या आंदोलनाशी किंवा शिक्षणाशी काही संबंध नाही ती म्हणजे एबीव्हिपी. त्यांनी अखिल भारतीय विश्वगुरु परिषद काढावी आणि जगभरात त्या मंत्र्यांचे मुलं बाहेर अभ्यास करतात तिथे त्यांनी आंदोलन करावी. पण देशातल्या या तरुणांशी त्यांचा काडी मात्र संबंध नाही. याउलटं हेच लोक देशद्रोही आहेत जे लाठीचार्ज करायला लावतायत, असेही ते म्हणाले.
































































