
लग्नाला चाललेली वऱ्हाडाची एसयुव्ही कार तलावात कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातात दोघे सुखरुप बचावले. अंधारामुळे वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे लग्नघरावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले. दोघांना वाचवण्यात यश आले, मात्र पाच जणांचा मृत्यू झाला होता.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ओडिशाच्या ढेंकनाल जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली. राम साहू (25), अविनाश साहू (26), राकेश कुमार साहू (25), चंद्रकांत स्वाइन (27) आणि अभिजीत साहू अशी मयतांची नावे आहेत. बांगुरसिंग गावातील अभिषेक साहू याचे लग्न इंदूपूर गावचे रहिवासी रोहित कुमार पृष्टी यांच्या मुलीशी होणार होते. लग्नाचे पाहुणे घेऊन अनेक गाड्या वधूच्या गावाकडे जात होत्या. दरम्यान, रस्त्यावरील एका वळणावर अंधारामुळे एसयूव्हीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती तलावात कोसळली.
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बऱ्याच प्रयत्नांनंतर गाडी तलावातून बाहेर काढली. ढेंकनाल सदर पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा मुख्यालयातील रुग्णालयात हलवले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बांगुरसिंग आणि इंदूपूर या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.




























































