Yavatmal news – दोन मुलांनंतर हताश वडिलांनीही जीवन संपवलं; कर्ज, नापिकी आणि प्रलंबित वीजजोडणीने घेतला बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सततची नापिकी, वाढता कर्जाचा डोंगर आणि शेतीसाठी आवश्यक असलेली वीजजोडणी न मिळाल्याने अखेर नैराश्यातून 62 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. ज्ञानेश्वर मालेकर असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी बुधवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला.

ज्ञानेश्वर मालेकर यांनी आपल्या पाच एकर शेतीला पाणी मिळावे यासाठी लाखो रुपये खर्च करून बोअरवेल खोदली होती. सिंचनाची सोय व्हावी म्हणून त्यांनी महावितरणकडे वीजजोडणीसाठी रीतसर अर्ज करून आवश्यक ती डिमांड रक्कमही भरली होती. मात्र, दीर्घकाळ उलटूनही त्यांना वीजजोडणी मिळाली नाही. एका बाजूला पिकांचे होणारे नुकसान आणि दुसरीकडे कर्जाचा वाढता ताण, त्यातच प्रशासकीय दिरंगाईमुळे न मिळालेली वीजजोडणी यामुळे मालेकर हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. याच असह्य त्रासातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

या घटनेतील सर्वात क्लेशदायक बाब म्हणजे, अवघ्या दोन वर्षांपूर्वी याच कुटुंबातील दोन तरुण मुलांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या दुहेरी आघातातून हे कुटुंब सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच, आता कर्त्या वडिलांनीही जीवन संपवल्यामुळे मालेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत ज्ञानेश्वर मालेकर यांच्या पश्चात आता केवळ त्यांची वृद्ध पत्नी असा परिवार उरला आहे. या घटनेमुळे पिंपळापूरसह संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड रोष आहे.

दरम्यान, उद्ध्वस्त झालेल्या मालेकर कुटुंबाला सरकारने तत्काळ भरीव मदत जाहीर करावी. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या रखडलेल्या वीजजोडण्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा. डिमांड भरूनही वीजजोडणी रोखून ठेवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.