
हार्ट अटॅक म्हणजे नेहमीच छातीत तीव्र वेदना असे अनेकांना वाटते. मात्र वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते ही समजूत पूर्णपणे योग्य नाही. काही रुग्णांमध्ये, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये छातीत दुखणे हे लक्षण दिसत नाही. अशा वेळी इतर काही सूक्ष्म लक्षणांद्वारे शरीर हार्ट अॅटॅकचा इशारा देत असते. ही लक्षणे ओळखण्यात उशीर झाल्यास रुग्णाच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे छातीत वेदना नसल्या तरी शरीरातील इतर बदलांकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
तज्ज्ञांच्या मते, अचानक श्वास घेण्यास त्रास होणे, कोणतेही विशेष कारण नसताना प्रचंड थकवा जाणवणे, थंड घाम येणे, चक्कर येणे, मळमळ किंवा उलटी होणे, अस्वस्थ वाटणे, तसेच जबडा, मान, पाठ किंवा डाव्या हातात वेदना किंवा जडपणा जाणवणे ही हार्ट अॅटॅकची महत्त्वाची लक्षणे असू शकतात. अनेकदा लोक ही लक्षणे गॅस, अपचन, अशक्तपणा किंवा सामान्य थकवा समजून दुर्लक्ष करतात. मात्र यामुळे उपचार सुरू होण्यास विलंब होतो आणि हृदयाच्या स्नायूंना अधिक नुकसान होऊ शकते.
डॉक्टरांच्या मते, अशी लक्षणे काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास तातडीने रुग्णालयात जावे. हार्ट अॅटॅकमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. वेळेत उपचार मिळाल्यास हृदयाचे नुकसान कमी करता येते आणि रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता वाढते.
तज्ज्ञांनी आहार आणि जीवनशैलीबाबतही विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. जंक फूड, तळलेले पदार्थ आणि जास्त चरबीयुक्त आहारामुळे शरीरातील एलडीएल म्हणजेच ‘बॅड’ कोलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपानापासून दूर राहणे आणि रक्तदाब, मधुमेह व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे ही हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे.




























































