हरण्याची मालिका हरारेत संपली रे… हिंदुस्थानचे सहा पराभवांचे ग्रहण अखेर सुटले; मयंक, वैभवच्या झंझावाताचा झिम्बाब्वेला दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावताना ज्या हातांवर संपूर्ण जगाने टाळ्यांचा वर्षाव केला होता, त्याच हिंदुस्थानी संघाच्या वाटय़ाला सलग सहा टी-20 सामन्यांतील पराभवाची कडू चव चाखावी लागली. आधी आयर्लंड आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या नॉनस्टॉप अपयशामुळे ‘विश्वविजेते’ या बिरुदाला जणू ग्रहण लागले होते. प्रत्येक पराभवानंतर एकच प्रश्न विचारला जात होता की जगज्जेत्या संघाची धार कुठे हरवली? पण हरारेच्या मैदानावर अखेर ती धार पुन्हा चमकली. दोन वर्षांनी पुनरागमन करणाऱया वेगवान गोलंदाज मयंक यादवच्या ज्वालामुखीसारख्या माऱयाने झिम्बाब्वेला गुडघ्यावर आणले आणि अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या वादळी फलंदाजीने हिंदुस्थानला सहज आणि सोप्पा विजय मिळवून दिला. हरारेत फक्त सामना जिंकला गेला नाही, तर पराभवाचे ओझेही झटकून हिंदुस्थानने नव्या आत्मविश्वासाने पुढे वाटचाल सुरू केली.

झिम्बाब्वेला 125 धावांत रोखल्यानंतर वैभव सूर्यवंशीच्या झंझावाताने सामन्यातील जीव काढून टाकला. अभिषेक शर्मा अवघ्या एका धावेवर बाद झाला, पण वैभवने 18 चेंडूंत 4 षटकार आणि 4 चौकार ठोकत झंझावती अर्धशतक साजरे केले. या खेळीमुळे सामन्यातील सारी हवाच निघाली. 50 धावांवर वैभव झंझावात थांबल्यानंतर इशान किशन (35) आणि श्रेयस अय्यर (ना. 28) यांनी 46 धावांची भागी करून हिंदुस्थानचा एकतर्फी विजय निश्चित केला. हिंदुस्थानने 40 चेंडू आणि 7 विकेट राखत विजय नोंदवला. 4 षटकांत 18 धावांत 2 विकेट टिपणारा मयंक सामनावीर ठरला.

गोलंदाजांनी विश्वास सार्थ ठरवला

कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि मयंक यादव व प्रिन्स यादव यांनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱया मयंकने पहिल्याच चेंडूवर ब्रायन बेनेटला बाद करत झिम्बाब्वेला धक्का दिला. त्यानंतर प्रिन्सनेही अचूक टप्प्यावर मारा करत प्रतिस्पर्ध्यांची फलंदाजी उद्ध्वस्त केली. मयंक (2/18) आणि प्रिन्स (2/19) यांच्या वेगवान गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा अर्धा संघ 64 धावांत गडगडला होता. मात्र त्यानंतर वेस्ली माधेवेरे (39) आणि ताडिवनाशे मरुमणी (नाबाद 27) यांनी सहाव्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी करत संघाला 125 धावांपर्यंत नेले. मात्र तोपर्यंत सामन्याचे पारडे हिंदुस्थानच्या बाजूने झुकले होते.

वैभव सर्वात तरुण अर्धशतकवीर

वय फक्त 15 वर्षे 118 दिवस… पण खेळ असा की समोरचा गोलंदाज अनुभवी असो वा नवखा, दया नाही. वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेविरुद्ध 18 चेंडूंत अर्धशतक झळकावत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी वयात अर्धशतक करणारा फलंदाज होण्याचा मान पटकावला. त्याने जिब्राल्टरच्या लुई ब्रूस (16 वर्षे 56 दिवस) याचा विश्वविक्रम मोडला. तसेच कविन चड्ढा (इंडोनेशिया – 16 वर्षे 76 दिवस), अलुसीन तुरे (सिएरा लिओन – 16 वर्षे 89 दिवस) आणि तेनजिन रबगी (भूतान – 16 वर्षे 118 दिवस) यांनाही तो मागे टाकून अव्वल स्थानावर पोहोचला. पूर्ण सदस्य राष्ट्रांमध्ये अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाजचा (17 वर्षे 296 दिवस) विक्रमही आता इतिहासजमा झाला. वैभवच्या या खेळीने त्यांचा धमाका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही दिसू लगला आहे.