
दिल्लीतील ‘जंतर मंतर’वर सुरू असलेल्या आंदोलनामुळे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएस कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्लीऐवजी गुरुग्राम कार्यालयातून काम करण्याची मुभा दिली आहे. कंपनीने आपल्या दिल्ली कॅम्पसमधील कर्मचाऱ्यांना नोएडा किंवा गुरुग्राम येथील कार्यालयांतून काम करण्याचे किंवा आपत्कालीन सवलत घेण्याचे आदेश दिले आहेत.
‘नीट’ परीक्षा पेपरफुटीच्या कथित प्रकरणावरून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या विद्यार्थी संघटनेचे मध्य दिल्ली आणि ‘जंतर मंतर’ परिसरात तीव्र निदर्शने आणि आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या प्रश्नामुळे टीसीएसला ही आपत्कालीन यंत्रणा लागू करावी लागली आहे. कंपनीच्या मुख्य ‘वर्क-फ्रॉम-ऑफिस’ धोरणात कोणताही कायमस्वरूपी बदल करण्यात आलेला नाही. टीसीएसने अलीकडच्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आठवडय़ातून पाच दिवस ऑफिसमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम ऑफिस मिळणार नाही, तर त्यांना दुसऱ्या कार्यालयातून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.

























































