IND Vs ZIM – वैभव सूर्यवंशीच वादळ झिम्बाब्वेत गोंगावलं; अर्धशतक ठोकत विक्रमाची नोंद, टीम इंडियाने सामना जिंकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 165 धावा उभारल्या आणि टीम इंडियासमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीने सुरुवातीपासूनच वादळी फटकेबाजी केली. प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा धुव्वा उडवत त्याने मैदानाभोवती चौकार-षटकारांची आतषबाजी केली आणि हिंदुस्थानला धडाकेबाज सुरुवात करून दिली. यामुळे टीम इंडियाने हा सामना 7 विकेटने जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

या सामन्यात तुफान फलंदाजी करत वैभवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. वयाच्या अवघ्या 15 वर्षे 118 दिवसांत त्याने ही थक्क करणारी कामगिरी करून दाखवली. यापूर्वी हा विक्रम नेपाळच्या कुशल मल्लाच्या (15 वर्षे 340 दिवस) नावावर होता. वैभवने अवघ्या 18 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये टीम इंडियासाठी सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही स्थान मिळवले.

वैभव सूर्यवंशीव्यतिरिक्त इशान किशन (35) आणि श्रेयस अय्यर (28*) यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाचा विजय निश्चित करण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडली आणि टीम इंडियाने 13.2 षटकांमध्ये आव्हानाचा यशस्वी पाठलाक करत सामना जिंकला. गोलंदाजीमध्येही संघाने दमदार कामगिरी केली. 2 वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या मयंक यादवने 2 विकेट घेतल्या तर प्रिंन्स यादवनेही 2 विकेट घेतल्या. तसेच शिवम दुबे आणि रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.