
शेतकऱ्यांप्रमाणे उद्या विद्यार्थीही आत्महत्या करतील, अशी भीती मी व्यक्त केली होती आणि तेच आज घडतेय. त्यातूनच हे आंदोलन उभे राहिले आहे. विद्यार्थ्यांसोबत इतर लोकही आंदोलनात उतरलेत. हा पूर्ण व्यवस्थेविरुद्धचा राग आहे. प्रश्न आता प्रधान आणि पंतप्रधानांच्याही पुढे गेलाय, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारच्या अहंकारी वृत्तीवर प्रहार केला.
पोलीस ड्रग्ज सप्लायर आहेत का?
‘‘पुन्हा या एरियात दिसलात तर तुमच्या खिशात 50 ग्रॅम पावडर टाकेन,’’ अशी धमकी एक पोलीस मुलांना देत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांकडे आता पावडरही मिळायला लागली का? हा जो पुणी पोलीस आहे तो ड्रग्ज सप्लायर आहे का? हे नेमपं चाललंय तरी काय? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
पंतप्रधानांच्या ट्विटला अर्थ नाही
नीटचे पेपर फुटण्याची ही तिसरी वेळ आहे. नीट परीक्षा जेव्हा आणल्या त्याच वेळी आम्ही विरोध केला होता. असल्या केंद्रीय पद्धतीने तुम्ही परीक्षा घेऊ नका, असे सांगत होतो. पण सत्ताच इतकी डोक्यात होती की कोणाचं ऐकायची त्यांची तयारी नव्हती आणि आजही तीच स्थिती आहे. आंदोलनाची सुरुवात मुलांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यापासून केली, परंतु आता ज्याप्रकारे मुलांना मारलं गेलं आहे ते पाहता हा प्रश्न आता प्रधानांपुरता मर्यादित न राहता पंतप्रधानांच्याही पुढे गेला आहे. पंतप्रधानांनी आज ट्विट केलं, पण त्या ट्विटला काही अर्थ नाही. खरं म्हणजे या मुलांना बोलावून चर्चा केली असती, प्रश्न नीट समजून घेतला असता तर एवढं सगळं प्रकरण घडलंच नसतं, असे राज ठाकरे यांनी सुनावले.
आज प्रत्येक घरात ज्यांची मुलं नीट परीक्षेला बसलेली नाहीत त्या आयांना, वडिलांनाही हे सगळं बघून त्रास होत आहे. जी मुलं मोठय़ा अपेक्षेने रस्त्यावर उतरली आहेत. त्याचं पुढे काय करायचं, त्याला कशी वाट करून द्यायची, या विचारातूनच रविवारचा मोर्चा निघत आहे, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. दिल्लीप्रमाणे मुंबईतही मुलं आणि पालक एकत्र येताहेत आणि आपला राग-रोष व्यक्त करताहेत. हे केंद्राला कळणं गरजेचं आहे. त्यांच्यापर्यंत हा आवाज पोहचला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
शरद पवार…जंतर मंतर आणि मोदी-भेट
शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता त्यालाच जंतर मंतर म्हणतात, असे राज ठाकरे उद्गारले. मोर्चाबाबत पवार यांना कल्पना दिली आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला असता, त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ज्याला देशाच्या भविष्याविषयी चिंता आहे असे सर्वभाषिक, सर्वधर्मीय दिल्लीत एकत्र आलेत. शरद पवार या मुलांना भेटण्यासाठी गेले होते. नंतर पंतप्रधानांना भेटून त्यांच्याकडे त्यांनी काय चिंता व्यक्त केली माहीत नाही. पण पंतप्रधानांनी मुलांना भेटण्याची आता खरी गरज आहे. नुसतीच ढकलमगाडी चालणार असेल तर काही उपयोग नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्या मोर्चाला शरद पवार येणार असतील, देवेंद्र फडणवीस आणि अगदी नरेंद्र मोदी येणार असतील तर जरूर येऊ द्या, असेही ते म्हणाले.
हा विषय मतपेटीचा नाही, निवडणुकीचा नाही, हा विद्यार्थ्यांच्या न्यायाचा आहे. विद्यार्थी आत्महत्या करताहेत. किती गंभीर विषय आहे हा! ज्या प्रकारे सत्ता राबवली जात आहे त्याच्याविरुद्धचा हा राग आहे. हा राग प्रत्येक राज्याराज्यातून बाहेर येतोय.
आर. आर. पाटील यांचे पद एका वाक्याने गेले!
भाजप जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा त्यांनी अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते. रझा अकादमीच्या विरोधात आम्ही जेव्हा मोर्चा काढला होता तेव्हा आम्ही मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा मागितला होता. तेव्हा अरुप पटनायक आयुक्त होते. काँग्रेसचं सरकार होतं. पटनायक यांना सरकारने पदावरून बाजूला केले होते. मुंबईत जेव्हा 26/11 चा हल्ला झाला तेव्हा आर. आर. पाटील म्हणाले होते, ‘बडी बडी शहरों में छोटी छोटी बाते होती रहती है…!’ त्या एका वाक्यावरून त्यांना गृहमंत्रीपदावरून काढून टाकण्यात आलं होतं. म्हणूनच पदाची जेव्हा तुम्ही जबाबदारी घेता तेव्हा पदातून आलेल्या अपयशाचीदेखील जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. हीच मागणी आज त्या मुलांनी केली आहे, असे राज ठाकरे यांनी सुनावले.
सत्तेचा हा उद्दामपणा कशासाठी आहे! हीच गोष्ट शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी झाली. त्यावेळीही पंतप्रधान कोणाला भेटायला तयार नव्हते. मणिपूरच्या वेळीही तेच घडले. ग्रामीण भागात आदिवासींची आंदोलने होताहेत. तिकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही. ही पुठली सत्ता आणि माज… ही मुलं असं काय मागत होती. नीटची परीक्षा द्यायला किती कष्ट, किती त्रास असतो हे मुलांना विचारा एकदा.
मोर्चात गुंड घुसवाल तर एकेकाला फटकावून काढू!
शांततेने हा मोर्चा होईल. सगळ्या गोष्टी शांततेत पार पडतील. त्यात कोणतीही हुल्लडबाजी नसेल. पण दिल्लीसारखं इथे काही करण्याचा प्रयत्न झाला, गुंड घुसवले तर आमची लोपं सोडणार नाहीत. एकेकाला फटकावून काढतील, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करतोय, अशी टीका देवेंद्र फडणवीस आणि जे. पी. नड्डा यांनी केली आहे, असे विचारले असता भारतीय जनता पक्ष आजपर्यंत काय करत आलाय? असा प्रतिसवाल राज ठाकरे यांनी केला. काँग्रेसच्या राजवटीतही अनेकदा पेपर फुटले असे भाजप म्हणतो, त्याकडे लक्ष वेधले असता तेव्हा आंदोलने झाली, सरकार बदललं, यांचं सरकार आलं, असे सांगत राज ठाकरे यांनी निशाणा साधला.
सरन्यायाधीश म्हणतात, ‘‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे फुटेज पाहण्यात मला रस नाही. उगाच आमचा वेळ वाया घालवू नका.’’ मुळात त्यांच्यामुळेच हे झुरळ उठलं ना! या झुरळांचे जन्मदातेच ते आहेत. जन्म दिल्यानंतर त्या पोराकडे बघायला नको का?


























































