
दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजेच शिवतीर्थावर उद्या सायंकाळी 4 वाजता तिरंगा आंदोलन केले जाणार असल्याचे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सांगितले.
येत्या रविवारी शिवतीर्थ ते श्री सिद्धिविनायक मंदिर असा भव्य तिरंगा मोर्चा काढला जाणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली. तत्पूर्वी आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी उद्याचा राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रमही त्या मोर्चावेळी होईल, असे असे सांगितले होते. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर विद्यार्थी आणि तरुणांनी मोठय़ा प्रमाणात मेसेज आणि पोस्ट करून उद्याचा राष्ट्रगीत गायनाचाही कार्यक्रमही व्हायला हवा, अशी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन उद्याचा कार्यक्रमही कायम ठेवला गेला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी जमावे, ठीक 5 वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
त्या पोलिसाचे फोटो जागोजागी लावा
आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांच्या गाडीतून घेऊन जात असताना एका पोलिसाने विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रगची पावडर टाकण्याची धमकी दिली होती. त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र केवळ कारवाई नको तर त्या पोलिसाला बडतर्फ करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. ज्या पोलिसांनी ड्रग पकडले पाहिजे ते तरुणांना, कॉलेज विद्यार्थ्यांना धमक्या देत आहेत. विद्यार्थ्यांची देशभक्ती ग्रॅममध्ये मोजता तुम्ही? ही कुठली दादागिरी? असा संतप्त सवाल त्यांनी केला. विद्यार्थ्यांना धमकावणाऱ्या त्या पोलिसाचे पह्टो जागोजागी लावा, असेही ते म्हणाले.
उद्या धरपकड झाली तर राज्यभरात रस्त्यावर येऊ
शिवतीर्थाजवळ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. उगीच धरपकड करू नका, आंदोलन चिघळले तर कोणाच्या हातात राहणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. उद्या जर धरपकड झाली तर महाराष्ट्रभर रस्त्यावर येऊ आणि फडणवीसांचे पोलीस असे वागताहेत हे सर्वांना दाखवून देऊ, असेही ते म्हणाले.
कॉक्रोचची देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाची हाक
20 जुलै रोजी संसदेवरील मोर्चात आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी कॉक्रोच पार्टीने शुक्रवार 24 जुलै रोजी देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाची हाक आज दिली. प्रत्येक जिल्हय़ांत दिवसभर हे आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




























































