महाराष्ट्रात जुलैमध्ये सात वेळा भूकंपाचे धक्के, हिंगोलीत सर्वाधिक सहा वेळा धक्के; पालघरमध्ये समुद्रात भूकंप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात जुलै महिन्यात सात वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यातील सहा धक्के एकट्या हिंगोली जिल्ह्यात बसले, तर पालघरमध्ये अरबी समुद्रात पाच किमी खोलीवर भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. हिंगोली आणि पालघरमध्ये भूकंपांच्या धक्क्यांची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट मोडवर आला आहे.

हिंगोलीत 9 जुलै रोजी एका दिवसात चार वेळा भूकंपाचे धक्के बसले. त्यात किमान 3.6 रिश्टर स्केल ते कमाल 4.6 रिश्टर स्केलपर्यंत भूकंपाची तीव्रता होती. तर 11 जुलै रोजी 4.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हे सर्व भूकंप जमिनीपासून दहा किमी खोलीवर झाले. 2017 पासून भूकंपाचे धक्के बसत असून त्याची तीव्रता वाढत आहे. 1993 मध्ये किल्लारीत विनाशकारी भूकंप झाला होता. तेव्हा तो 6.4 रिश्टर स्केलचा होता. त्यानंतर आता जुलै महिन्यात तब्बल 33 वर्षांनी मराठवाड्यात सर्वात मोठा भूकंप झाला. त्यामुळे या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वीच्या भूकंपाच्या आठवणी या भागातील लोकांच्या मनात ताज्या झाल्या.

पालघरमध्ये 19 जुलै रोजी सकाळी 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. अरबी समुद्रात पाच किमी खोलीवर भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी दिली. 2018 पासून पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. पालघर जिल्ह्याच्या डहाणू-तलासरी भागात मागील तीन वर्षांपासून लहान-मोठ्या भूकंपाच्या हादऱ्यांचे सत्र सुरूच आहे; पण हे हादरे मागील सात महिन्यांपासून बंद झाले होते. मात्र, आता पुन्हा एकदा भूकंप जाणवण्यास सुरुवात झाली आहे. सुदैवाने आजवर या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे मोठी जीवितहानी झाली नसली, तरी सतत बसणाऱ्या धक्क्यांमुळे या परिसरातील घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.