पाणीपुरवठ्यासाठी ऑगस्ट 2027 पर्यंतचा ‘मास्टर प्लॅन’, धरणे 70 टक्के भरली तरी ‘‘एल निनो’चा धसका; 10 टक्के पाणीकपात कायम राहणार, सध्याचा जलसाठा – 10,09,432 दशलक्ष लिटर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवेंद्र भगत, मुंबई

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत सद्यस्थितीत 10,09,432 दशलक्ष लिटर म्हणजे 70 टक्के जलसाठा जमा झाला आहे. हे पाणी मार्चपर्यंत पुरणारे आहे, मात्र ‘एल निनो’च्या धसक्यामुळे पालिकेने ऑगस्ट 2027 पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईतील 10 टक्के पाणीकपात कायम राहणार असल्याचे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबईला मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज 4,100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी उपलब्ध असलेल्या जलसाठ्यानुसार वर्षभराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते, मात्र या वर्षी ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका पाणीकपात मागे घेण्याबाबत सावध पवित्रा घेत आहे. यातच राज्य सरकारनेही ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट 2027 पर्यंत मुंबईला पुरेसा पाणीपुरवठा करता येईल, असे नियोजन करा असे निर्देश पालिकेला दिले आहेत. याबाबत राज्य सरकारकडून पालिकेला ‘गाईड लाइन्स’ही जारी करण्यात आली आहे.

असा आहे धोका

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील जलसाठा मेअखेर 5 ते 7 टक्क्यांपर्यंत खाली जातो. यातच गेल्या काही वर्षांपासून पाऊस जूनही कोरडा घालवत असल्याने 10 ते 20 टक्के पाणीकपात करण्यात येत आहे.

मुंबईला पाणी देण्यासाठी भातसामधून 147092 दशलक्ष लिटर आणि अप्पर वैतरणाच्या राखीव जलसाठ्यातून 90000 दशलक्ष लिटर पाणी घेतले जात आहे.

व्यावसायिकसाठी 20 टक्के पाणीकपात

धरणांतील पाणीसाठा 10 टक्क्यांपेक्षा खाली आल्याने मुंबईत या वर्षी 15 मेपासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तर आता 20 जुलैपासून नागरी वस्ती नसलेल्या इंडस्ट्रिअल एरियासाठी 20 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

मोडक सागर ओव्हर फ्लो

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील महत्त्वाचे मोडक सागर धरण आज ओसंडून वाहू लागले आहे.  या आधी तुळशी, विहार, तानसा धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत.