
विद्यार्थ्यांवर ड्रग्जचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाला सेवेतून तत्काळ बरखास्त करून अटक करा व त्याची चौकशी करा, अशी मागणी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आज पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना भेटून केली. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनाही तसे निवेदन देण्यात आले. त्यावर संबंधित पोलिसाची चौकशी सुरू असून अहवालानंतर कारवाई करू, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, आमदार भाई जगताप यांच्यासह काँग्रेस नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. पेपरफुटी प्रकरणी संतप्त तरुणाई रस्त्यावर उतरून न्याय मागत असताना पोलीस मात्र गुंडगिरी करत आहेत. लहान मुलांवरही बेछूटपणे लाठीमार करत आहेत.
लोकशाहीने आंदोलनाचा दिलेला अधिकार चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, हे तत्काळ थांबले पाहिजे. महाराष्ट्रात हे पोलीसराज काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, असे सपकाळ यांनी निवेदनात म्हटले आहे.
पत्रकारांना वार्तांकन करताना अडवणे, धक्काबुक्की करणे, ताब्यात घेणे यासारख्या घटना थांबविल्या पाहिजेत, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.






























































