
दोन वर्षांपूर्वी झालेल्या नीट पेपरफुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार आणि ‘किंगपिन’ संजीव कुमार ऊर्फ संजीव मुखियाला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) क्लीन चिट दिली आहे. या पेपरफुटीच्या गुह्यात संजीव मुखियाचा थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे तपासात समोर आलेले नाहीत, असे सीबीआयने म्हटले आहे.
सीबीआयने 2024मधील नीट पेपरफुटीबाबत 45 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यात सीबीआयने म्हटले की, या घोटाळ्यात सहभागी असलेल्या प्रत्येक मुख्य आरोपीची आणि त्याचा लाभ घेणाऱयांची ओळख पटवण्यात आली आहे. संजीव मुखिया याला या प्रकरणात जामीन देण्यात आला आहे. मात्र दुसऱया एका पेपरफुटीच्या प्रकरणात तो अटकेत असल्यामुळे त्याचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे.
सीबीआयने केला होता प्रकरणाचा तपास
2024मध्ये नीटचा पेपर फुटला होता. त्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. सीबीआयने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत प्रश्नपत्रिका चोरीपासून ती वाटण्यापर्यंतच्या प्रत्येक साखळीचा पर्दाफाश केला.






























































