
परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडे मोकळ्या जमिनीच शिल्लक नाहीत. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) ३५० हेक्टर सरकारी जमीन मिळावी, अशी मागणी कोकण मंडळाने यापूर्वीच राज्य सरकारकडे केली असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी नवीन गृहनिर्माण प्रकल्प उभारायचे कसे, असा प्रश्न आता म्हाडापुढे उभा राहिला आहे.
मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) घरांकडे नागरिकांचा कल वाढला आहे. कोकण मंडळाने गतवर्षी ठाणे, वसई, नवी मुंबईतील ५,२८५ घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यासाठी दीड लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले. यावरून मुंबईच्या आसपासच्या परिसरातील घरांनाही नागरिकांची मोठी मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आगामी काळात कोकण मंडळाला ठाणे, पनवेल, अंबरनाथ, भिवंडी, वसई, पालघर जिल्ह्यांत सर्वसामान्यांसाठी मोठ्या प्रमाणात परवडणाऱ्या घरांची निर्मिती करायची आहे; परंतु त्यासाठी कोकण मंडळाकडे मोकळ्या जमिनी शिल्लक नाहीत. त्यामुळे या ठिकाणच्या सरकारी जमिनी मिळाव्यात, अशी मागणी कोकण मंडळाकडून राज्य सरकारकडे यापूर्वीच करण्यात आली आहे. मात्र, या मागणीवर अद्याप शासन स्तरावर निर्णय झालेला नाही.































































