
ऐतिहासिक मुंबई महापालिका मुख्यालयाच्या वास्तूतील अनेक कार्यालयांमध्ये वाळवी लागल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. या निकृष्ट कामाबाबत स्थायी समितीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पालिका मुख्यालयातील कार्यालयांमधील दरवाजे वाळवीने पोखरून निघाले आहेत. याबाबतचा हरकतीचा मुद्दा भाजपाचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी उपस्थित केला. त्यावर चर्चा करताना अनेक सदस्यांनी पालिका मुख्यालयातील अस्वच्छता, तसेच झुरळ आणि उंदरांचा त्रास वाढल्याची तक्रार केली. केबिन आणि शौचालयांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. पालिका इमारतीचे नूतनीकरण करण्याचा विचार आहे का, याची विचारणा केली. याप्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी निकृष्ट कामाबाबत कंत्राटदारावर कडक कारवाईचे निर्देश दिले.






























































