सर्पदंशाच्या निदानासाठी ‘स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट किट’ खरेदी, 1 कोटी 22 लाख रुपयांचा निधी मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात दरवर्षी सर्पदंशामुळे सरासरी चार हजार लोकांचा मृत्यू होतो. यातील अनेक मृत्यू योग्य निदान न झाल्यामुळे, म्हणजेच विषारी सापाची ओळख न पटल्यामुळे होतात. त्यामुळे शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सर्पदंशाचे जलद निदान करण्यासाठी ‘स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट किट’ खरेदीसाठी सरकारने १ कोटी २२ लाख ८३ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.

२०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी संबंधित अर्थसंकल्पीय तरतुदीतून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यातून किटची खरेदी केली जाणार आहे. यापूर्वी शासकीय आरोग्य संस्थांसाठी किटच्या खरेदीसाठी ६ कोटी १४ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी अर्थ विभागाने अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेल्या रकमेपैकी २० टक्के म्हणजेच १ कोटी २२ लाख ८३ हजार रुपये खर्चासाठी आता मंजूर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या मुख्य लेखा आणि वित्त अधिकाऱ्यांकडे हा निधी वर्ग करण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार योग्य निदानाअभावी आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जगात दरवर्षी सव्वालाखाहून अधिक लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. विषारी सापाच्या दंशामुळे दरवर्षी सरासरी ५५ हजार लोकांचे अवयव निकामी होतात. ग्रामीण भागात अनेकदा रुग्णाला कोणता साप चावला हे ओळखण्यात वेळ जातो. योग्य लक्षणांचे निदान न झाल्यामुळे सर्पदंशाची लस देण्यास विलंब होतो.