
‘पेपर तो ड्राय था फिर लिक कैसे हुआ’, अवर फ्युचर नॉट फॉर सेल’,जस्टीज? मेलेडी पाहिजे तर सांगा?’, लाठीनं आवाज दबणार नाही. न्यायाचा लढा थांबणार नाही.’ अशा जोरदार घोषणा देत आज रत्नागिरीकर हजारोच्या संख्येने आज रस्त्यावर उतरले. नीट परीक्षा पेपरफुटीनंतर जंतरमंतरवर सुरू असलेले आंदोलन चिरडून टाकण्यासाठी तरूणांवर अत्याचार करणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. नागरिकांबरोबरच विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. आपल्या भविष्याच्या रक्षणासाठी विद्यार्थीवर्ग रस्त्यावर उतरला होता.
शिव शाहू फुले आंबेडकर विचारमंचाने आज रत्नागिरीत मोर्चा काढला. नीट पेपर फुटीनंतर सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांनी जंतरमंतरवर सुरू केलेले आंदोलन चिरडण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. संसदेबाहेर जमलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. महिलांना मारहाण करण्यात आली. या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी आणि तरूणांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज रत्नागिरीकर रस्त्यावर उतरले. मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरूवात झाली. अडीच ते तीन हजार नागरिक आणि विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले होते. सरकार विरोधी घोषणा आणि मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीने परिसर दुमदुमून गेला.
रत्नागिरीत पहिल्यांदाच हजारोंच्या संख्येने तरूण रस्त्यावर उतरलाय
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्या नंतर मोर्चाचे संयोजक अभिजीत हेगशेट्ये यांनी सांगितले की, आज रत्नागिरीत पहिल्यांदाच तरूण आणि विद्यार्थी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलाय. अडीच ते तीन हजार रत्नागिरीकर रस्त्यावर उतरले आहेत. कारण पेपरफुटीची झळ प्रत्येकाला बसली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा हा प्रश्न आहे. आज रत्नागिरीला जंतरमंतरचे स्वरूप आले आहे. हा लढा असाच पुढे सुरू राहील. संसदभवना बाहेर तरूणांवर केलेल्या लाठीमाराचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी सांगितले. या आंदोलनात माजी राज्यमंत्री रवींद्र माने, अभिजीत हेगशेट्ये, राजापूरच्या नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख दत्ता कदम, लोकसभा मतदार संघाच्या महिला संपर्क संघटक आणि जिल्हा परिषद सदस्या नेहा माने, दिशा आंब्रे, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, युवासेना राज्य सचिव प्रदुम्न माने, कॉंग्रेसचे अशोक जाधव, नौसीन काझी, बशीर मुर्तुझा, प्रथमेश गावणकर, नीलेश भोसले, दीपक राऊत, ॲड.पावसकर व इतर पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना दिले.





























































