
टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये आजपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान स्टार गोलंदाज मयंक यादवने जवळपास 2 वर्षांनी धमाकेदार पुनरागम केलं आहे. हरारे येथे सुरू असलेल्या या पहिल्याच टी20 सामन्यात मयंकाने डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेत झिम्बाब्वेला मोठा हादरा दिला. 149 किमी/तास वेगाने फेकलेला चेंडू झिम्बाब्वेंचा फलंदाज ब्रायन बेनेटला समजला नाही आणि तो बाद झाला. मयंक यादवने घेतलेली ब्रायन बेनेटची विकेट ऐतिहासिक ठरली आहे.
या अफलातून कामगिरीसह मयंक T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात डावाच्या पहिल्याच चेंडूवर बळी घेणाऱ्या हिंदुस्थानच्या मोजक्या गोलंदाजांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. विशेष म्हणजे मयंकने हा पराक्रम दुसऱ्यांदा केला आहे. यापूर्वी 2024 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही त्याने पहिल्याच चेंडूवर गडी बाद केला होता. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने असा पराक्रम सर्वाधिक 3 वेळा केला असून, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनीही प्रत्येकी 2 वेळा डावाच्या पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे.
मयंक यादवने 6 ऑक्टोबर 2024 रोजी बांगलादेशविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्या मालिकेत 3 सामन्यांत 4 बळी घेत त्याने छाप पाडली होती, परंतु त्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे त्याला आयपीएलसह टीम इंडियामधून दीर्घकाळ बाहेर राहावे लागले होते. अखेर दुखापतीवर मात करून दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मयंकने संघात परतताच आपल्या घातक वेगाने पुन्हा एकदा क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे.




























































