
नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे निराश होऊन परळीतील एक 18 वर्षीय युवक घरातून निघून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाथ रोड परिसरात राहणारा 18 वर्षीय आदित्य भगवान राठोड असे या बेपत्ता युवकाचे नाव आहे. आदित्य बारावीचे शिक्षण आणि नीट परीक्षेच्या तयारीसाठी लातूर येथे क्लासेसला होता. 16 जुलै रोजी नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याला 131 गुण मिळाले होते. निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच 17 जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो परळी येथील राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेला.
आदित्य रात्रीपासून घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे आणि सर्व परिचितांकडे त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेरीस, 18 जुलै रोजी आदित्यचे वडील भगवान राठोड यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात जाऊन तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून युवकाचा कसून शोध सुरू आहे. या बेपत्ता युवकाबाबत कोणालाही काहीही माहिती मिळाल्यास किंवा तो आढळल्यास नागरिकांनी तात्काळ परळी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

























































