उमेद – कलेचा वारसा पुढे नेताना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आत्माराम नाटेकर

पाऊस सुरू होण्याआधी गणेशमूर्तींचे कारखाने, मूर्ती घडवणारे कलाकार यांच्याबाबत चर्चा घडू लागते. मूर्ती घडवणारे हे हात त्यांचे कौशल्य दर्शवतानाच मातीतून जिवंतपणा साकारणारा एक अनुभवही मांडतात. अशाच एका कलाकाराची ही कहाणी.

त्याचं नाव विश्वनाथ, पण तो गावात ओळखला जातोय पिंटय़ा म्हणून. घरात साऱ्यांचाच तो पिंटय़ा बनला, तसा अख्ख्या गावाचाही. साहजिकच त्याच्या खऱया नावाची कोणाला गरजच भासली नाही. आज चाळीशीत असलेला पिंटय़ा अवघ्या 15 व्या वर्षांपासूनच मोलमजुरी करतोय.

पारकर टी हाऊस हे मालवण तालुक्यातील चिंदर गावातील परवाना मिळालेले पहिले हॉटेल. याच दुकानात पिंटय़ा संदीप पारकर याच्या हाताखाली काम करू लागला. आज संदीप आपल्यात नाही, पण पिंटय़ा आजही पारकर कुटुंबाची मनोभावे चाकरी करतोय आणि तोही अगदी इमानेइतबारे. अचूक आणि नियोजनबद्ध काम करणे हा पिंटय़ाचा गुणधर्म. सदैव हसतमुख, आनंदी आणि तितकाच खोडकर पिंटय़ा हे आमच्या भटवाडीला लाभलेले दैवी देणे आहे. कोणतेही काम निष्ठेने आणि विश्वासाने करणारा पिंटय़ा समाजप्रियसुद्धा आहे. तो उत्तम मृदंगवादकही आहे.

पिंटय़ाचे आजोबा विठ्ठल दळवी हे हाडाचे कलाकार. लोक त्यांना आदराने दादा म्हणत. गावातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असामी. सुतारकाम, लोहारकाम यात त्यांचा जसा हातखंडा तसा गणपती बनवण्यातही. आमच्या गावातील अनेक गणपती दादांच्या शाळेत बनायचे. दादांचे 2006 साली देहावसान झाले. आता गणपती शाळा बंद पडणार असे त्या वेळी अनेकांना वाटू लागले, पण आजोबांच्या शाळेत चालणारी कामे पाहिलेला पिंटय़ा स्वस्थ बसला नाही. आपल्या वडिलांच्या मदतीने पिंटय़ाने आपल्या हाती ब्रश घेतले. पहिल्या एक-दोन वर्षांत काही मोजकेच गणपती बनवले. मग हळूहळू पिंटय़ाने आपली गणपतीची संख्या वाढवली. आज पिंटय़ाच्या शाळेत तब्बल शेकडो गणपती आहेत. या मूर्ती 1 फुटापासून 7 फुटांपर्यंत आहेत.

आपली दुकानातील नोकरी सांभाळून पिंटय़ा दिवस-रात्र गणपतीच्या शाळेत राबत असतो. त्याची आते ललिता (लग्नानंतर ती सुचिता संदीप परब झाली.) हिची मोलाची साथ पिंट्याला लाभतेय. पिंट्या आता रायगड जिह्यातील पेणच्या शाळेतून सुबक मूर्ती घेऊन येतो आणि त्यावर आपला जीव ओततो. ऐन पावसाळ्यात शेतीची कामे सांभाळून पिंट्या आता रात्रं-दिवस शाळेत वावरताना दिसेल.

त्याच्या या आकर्षक मूर्ती आता गावोगावी जाऊ लागल्या आहेत. अतिशय आकर्षक, रेखीव आणि देखण्या मूर्ती हे पिंटय़ाचे कौशल्य आहे. डोळे उघडणे हे सर्वात कठीण काम. पिंटय़ाचा यात हातखंडा आहे. मोठा भाऊ नवनाथ, वडील, बंडूकाका, नारायण येरम, शशी नाटेकर तसेच वाडीतील अनेक जण आणि मुंबईहून आलेली भावंडे आता पिंटय़ाच्या शाळेत रात्रं-दिवस राबताना दिसतील. त्याच्या प्रशस्त घरातल्या खोल्या आता गणपतीने भरलेल्या आहेत.

1975 साली आमचा गणपती पिंटय़ाच्या आजोबांकडे होता. मी त्या वेळी अवघा 10 वर्षांचा होतो. वडिलांनी 15 रुपये गणपतीच्या पुढय़ातील विडय़ावर ठेवले. आज या घटनेला 50 वर्षे झाली. आमचा गणपती आजही याच शाळेत आहे.
अत्यंत प्रामाणिक, सदा हसतमुख आणि परोपकारी पिंटय़ा आज अवघ्या चाळीशीचा आहे. पुढील अनेक वर्षे तो निश्चितच आपल्या आजोबांचा वारसा चालवेल. तेव्हा दळवी घराण्यातील गणपती शाळेचा शतक महोत्सव साजरा होईल. गणपती बाप्पा, याकामी आमच्या पिंटय़ाला निश्चितच सुयश दे. त्याच्या हातून विघ्नहर्त्या गजाननाची आणि पर्यायाने गावाची सेवा घडू दे, हेचि एक मागणे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)