तिमिरातुनी तेजाकडे… भाजी विक्रेत्याच्या पोराला कांस्यपदक, झंडू कुमारने हिंदुस्थानचे पदक खाते उघडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानने अखेर पदकांचे खाते उघडले. बिहारचा पॅरा पॉवरलिफ्टर झंडू कुमार याने पुरुष हेविवेट गटात कांस्यपदकाची कमाई केली. 190 किलो वजनाची यशस्वी उचल करत त्याने 130.9 गुण मिळवले आणि हिंदुस्थानला स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले.

28 वर्षीय झंडू कुमारने ‘ब’ गटामधून खेळताना पहिल्याच प्रयत्नात 181 किलो, तर दुसऱयरा प्रयत्नात 190 किलो वजन उचलले. त्यामुळे त्याला 130.9 गुण मिळाले. तिसऱ्या प्रयत्नात त्याने 196 किलो वजन उचलून बर्किंगहम 2022 मधील स्पर्धा विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. तरीही त्याची दुसरी सर्वोत्तम उचल कांस्यपदकासाठी पुरेशी ठरली. नायजेरियाच्या रिलुवान इद्रिसने सुवर्ण, तर इंग्लंडच्या मॅथ्यू हाेर्डिंगने रौप्यपदक पटकावले.

संघर्षातून घडलेला ‘झंडू’चा सुवर्णप्रवास

बिहारमधील नालंदा जिह्यातील हरनौत येथील झंडू कुमार बालपणापासून पोलिओग्रस्त आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने वडिलांसोबत रस्त्यावर भाजीपाला विकला. कोविड काळात ई-रिक्षा चालवून घर चालवले. आज त्याच खेळाडूने राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकत संघर्षाचे सोने केले आहे.

ई-रिक्षा विकून खेळला राष्ट्रीय स्पर्धा

2023 मधील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी झंडूने स्वतःची ई-रिक्षाच विकली होती. त्या स्पर्धेत त्याला एकही यशस्वी उचल करता आली नव्हती. मात्र, त्याची गुणवत्ता पॅरालिम्पिक कांस्यपदकविजेते राजिंदर सिंह राहेलू यांच्या नजरेत भरली. त्यानंतर हिंदुस्थानी क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) प्रशिक्षण केंद्रात त्याला संधी मिळाली आणि त्याच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले.

सुधीर सहाव्या स्थानी; कस्तुरीला अपयश

पुरुष पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीर याने 183 किलो वजन उचलत सहावे स्थान मिळवले. महिला हेविवेट गटात कस्तुरी राजामणी हिला तिन्ही प्रयत्नांत अपयश आल्याने एकही वैध उचल नोंदवता आली नाही.

सचिन सिवाचची दमदार आगेकूच

पुरुष 60 किलो गटाच्या राऊंड ऑफ-32 सामन्यात हिंदुस्थानच्या सचिन सिवाच याने कॅनडाच्या केओमा अल अहमदिहेचा 4-1 अशा विभाजित निर्णयाने पराभव करत राऊंड ऑफ-16 मध्ये प्रवेश केला. 2022 राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या प्रतिस्पर्ध्यावर सचिनने आक्रमक खेळ करत वर्चस्व गाजवले.

लॉन बॉल्समध्ये विजयी

महिला पेअर्स सेक्शनल सामन्यात हिंदुस्थानच्या रूपा राणी तिकाa आणि पिंकी यांच्या जोडीने टोंगाच्या पॅरिस बेकर आणि मिलिका नाथन यांचा टायब्रेकरमध्ये पराभव केला. नियमित खेळात दोन्ही संघ 1-1 अशी बरोबरीत होते. त्यानंतर टायब्रेकरमध्ये हिंदुस्थानने 2-0 अशी सरशी करत सलग विजय नोंदवला.