नरसीतील कुंटणखाण्याचा पर्दाफाश; आशीर्वाद व आनंद लॉजवर पोलिसांची धडक कारवाई, 7 पीडित महिलांची सुटका, 10 आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नरसी येथील बसस्थानकासमोरील ‘आशीर्वाद लॉज’ व ‘आनंद लॉज’वर पोलीस उपअधीक्षक शाम पानेगावकर यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत कुंटणखाण्याचा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईत देहविक्रीसाठी आणलेल्या ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, लॉज मालकासह एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच मोबाईल आणि रोख रक्कमेसह २ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नरसी येथील बसस्थानकासमोरील ‘आशीर्वाद लॉज’ आणि ‘आनंद लॉज’ येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती बिलोली विभागाचे पोलीस उपअधीक्षक शाम पानेगावकर यांना मिळाली होती. शनिवारी शासकीय पंचासमक्ष ‘डमी’ ग्राहक पाठवून खातरजमा केली असता, दोन्ही लॉजमधील खोल्यांमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक शाम पानेगावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन्ही लॉजवर एकाच वेळी धाड टाकली. या कारवाईदरम्यान तेथे देहविक्रीसाठी आणलेल्या ७ महिला आढळून आल्या. यामध्ये नांदेड आणि पश्चिम बंगालमधील महिलांचा समावेश आहे. पोलीस पथकाने त्यांची तेथून सुटका करून पुनर्वसनासाठी पाठवण्याची कारवाई केली.

या प्रकरणी लॉज मालक पांडुरंग श्रीरगिरे यांच्यासह राहुल कोलते, विश्वंभर गाडे, बालाजी सूर्यवंशी, खाकीबा सूर्यवंशी, नरसिंह ठाकूर, प्रवीण वारनलवार, कृष्णा देशपीठवार, व्यंकट नारे आणि विक्की इंदूरकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. धाडीच्या ठिकाणाहून रोख रक्कम, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण २ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींविरुद्ध ‘अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्या’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशाने बिलोली विभागाचे पोलीस उपअधीक्षक शाम पानेगावकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, रामतीर्थचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे, साईनाथ पुय्यड, महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड, तसेच पोलीस अंमलदार कवठेकर, लोसरवार, बामणे, कुलथे, बिरादार, स्वामी आणि माने आदींचा समावेश होता.

हायप्रोफाईल ग्राहक अन् “रात्रीस खेळ चाले”!

नांदेड जिल्ह्यातील प्रमुख चौरस्ता असलेल्या नरसी येथील मुख्य बसस्थानकासमोर, भर बाजारपेठेत बिनधास्त चालवल्या जाणाऱ्या या कुंटणखाण्यात काही उच्चभ्रू आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित मंडळींचा सर्रासपणे “रात्रीस खेळ” चालत होता, अशी जोरदार चर्चा आता रंगली आहे. हायप्रोफाईल ग्राहकांसाठी परप्रांतीय महिलांची सोय करण्यात येत होती, अशीही माहिती समोर येत असून, या सुविधेचे नेमके “लाभार्थी” कोण-कोण होते, यावरही कारवाईचा रोख असावा, अशी मागणी जोर धरत आहे.