
सध्याचे मुख्य प्रशिक्षक सातत्याने त्याच खेळाडूंच रडगाणं गाताना दिसत आहेत. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत हार्दिक दुखापतग्रस्त झाला होता. मात्र मुख्य प्रशिक्षक द्रविड यांनी संघ अस्थिर होऊ दिला नाही. सध्याचे प्रशिक्षक अर्धवट तयार असलेल्या अष्टपैलू खेळाडूंना खेळवण्याच्या ध्यासाने पछाडलेले आहेत. या मूर्खपणामुळे आपण कसोटीतही पराभूत होत आहोत, अशा खरमरीत शब्दांत हिंदुस्थानचा माजी फिरकीपटू आर. अश्विनने नाव न घेता गौतम गंभीर याला खडे बोल सुनावले आहेत.
अश्विन म्हणाला, ‘हार्दिक पांडय़ा संघात नाही तर तुम्ही वारंवार त्याच खेळाडूंच रडगाणं गाता, जे फिट नाहीत. सध्याचे प्रशिक्षक अर्धवट तयार असलेल्या अष्टपैलू खेळाडूंना खेळवण्याच्या ध्यासाने पछाडलेले आहे. या मूर्खपणामुळे आपण कसोटीतही पराभूत होत आहोत. मात्र, हिंदुस्थानला खरंच विश्वचषक जिंकायचा असेल तर रोजचे प्रयोग थांबवायला हवेत. गंभीर आणि निवड समितीने आता नाटकं बंद करावीत. तसेच दोन यष्टिरक्षक, तीन फिरकी गोलंदाज आणि पाच वेगवान गोलंदाज असलेल्या 17-18 खेळाडूंचा एक भक्कम चमू तयार करावा. हे खेळाडू पुढच्या 14 महिन्यांत खेळतील असं सांगावं. या गटातील खेळाडूंना आलटून पालटून संधी द्या. त्यामुळे विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात सर्वोत्तम प्लेइंग 11 घेऊन उतरता येईल.



























































