उड्डाण घेताच प्रवाशांमध्ये हाणामारी, 30 मिनिटांत युकेला जाणारे विमान माघारी परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उड्डाण घेताच प्रवाशांच्या एका गटात तुफान हाणामारी झाल्याने युकेकडे जाणारे इझीजेटचे विमान माघारी वळवण्यात आले. विमानात 186 प्रवाशी होते. विमान कॅनरी बेटांवर माघारी परतल्यानंतर आठ जणांना खाली उतरवण्यात आले.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, टेनेरिफहून मंगळवारी सायंकाळी इझीजेटच्या विमानाने लिव्हरपूलकडे (युके) उड्डाण घेतले. विमान 30,000 फूट उंचीवर असताना ब्रिटिश प्रवाशांच्या एका गटात वाद झाला. हळूहळू हा वाद विकोपाला गेला आणि हाणामारीत झाले. या प्रकारामुळे सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने विमान माघारी वळवण्याचा निर्णय घेतला.

टेनेरिफ साउथ विमानतळावर विमान उतरताच पोलिसांनी धाव घेत सदर प्रवाशांना ताब्यात घेतले. विमानात बसण्यापूर्वीच विमानतळ टर्मिनलवर दोन कुटुंबांमध्ये बाचाबाची झाली होती. हा वाद विमानातही कायम राहिला, अशी माहिती मिळते. हाणामारी करणाऱ्या गटाला खाली उतरवल्यानंतर विमान पुन्हा युकेकडे रवाना झाले.