नेमबाजी विश्वचषकात हिंदुस्थानचा रौप्यवेध; सैन्यमची 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात रौप्यपदकाची कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने नेमबाजी विश्वचषकाची धमाकेदार सुरुवात केली आहे. हिंदुस्थानच्या नेमबाजी संघाने विश्वचषक स्पर्धेमध्ये पदकाचे खाते उघडले असून, 22 वर्षीय सैन्यमने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत शांतचित्त आणि अचूक नेमबाजी करत तिने 243.4 गुण मिळवून दुसरे स्थान पटकावले. या स्पर्धेतील हिंदुस्थानचे हे पहिले पदक ठरले आहे.

सैन्यमने पात्रता फेरीत 579 गुण मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम फेरीत तिने सातत्यपूर्ण कामगिरी करत जागतिक दर्जाच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये रौप्यपदकावर नाव कोरले. सैन्यमची ही कामगिरी तिच्या उत्कृष्ट फॉर्मचीच पुढची पायरी आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेतील 10 मीटर एअर पिस्तूल ट्रायल-2 मध्ये तिने 243.1 गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते. त्यापूर्वी दोहा येथे झालेल्या विश्वचषक अंतिम फेरीतही तिने रौप्यपदक जिंकले होते.

चंदीगडची रहिवासी असलेल्या सैन्यमने कनिष्ठ गटातही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. 2023 मध्ये सूहल येथील घ्एएइ ज्युनियर विश्वचषक आणि चांगवॉन येथील ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदके जिंकले होते. तसेच खेलो इंडिया युवा स्पर्धेतही ती पदक विजेती ठरली आहे. राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष कालिकेश नारायण सिंह देव यांनी सैन्यमच्या यशाचे कौतुक करताना म्हटले आहे की, ‘जागतिक दर्जाच्या नेमबाजांविरुद्ध संयम आणि तांत्रिक अचूकता राखत सैन्यमने केलेली कामगिरी तिच्या कठोर परिश्रमाची साक्ष आहे.’

हिंदुस्थानची आणखी एक नेमबाज सुरुची इंदर सिंहनेही अंतिम फेरी गाठली होती. पात्रता फेरीत 579 गुण मिळवून ती अंतिम फेरीत पोहोचली; मात्र अंतिम फेरीत 137.6 गुणांसह तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.