ब्रेन डिटॉक्स खरंच शक्य आहे का? याकरता काय करायला हवे, जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजकाल शरीरासोबतच “ब्रेन डिटॉक्स” हा शब्दही मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. मात्र, मेंदूला कोणत्याही जादुई पद्धतीने स्वच्छ करता येत नाही. तज्ज्ञांच्या मते, ब्रेन डिटॉक्स म्हणजे मेंदूवरील ताण कमी करणाऱ्या आणि मानसिक आरोग्य सुधारवणाऱ्या सवयी अंगीकारणे होय. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप. दररोज 7 ते 9 तासांची शांत झोप घेतल्याने मेंदू दिवसभरातील माहितीची प्रक्रिया करतो आणि पुनरुज्जीवित करतो.

मोबाइल, लॅपटॉप आणि सोशल मीडियाचा अतिवापर मानसिक थकवा वाढवतो. त्यामुळे दिवसभरात काही वेळ डिजिटल ब्रेक घेणे आवश्यक आहे. याशिवाय पुस्तक वाचणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे किंवा निसर्गाच्या सान्निध्यात राहणे यामुळेही मानसिक ताण कमी होतो. आहाराचाही मेंदूच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. हिरव्या भाज्या, फळे, सुका मेवा, प्रोटीनयुक्त पदार्थ आणि पुरेसे पाणी यामुळे मेंदूला आवश्यक पोषण मिळते. नियमित व्यायाम किंवा दररोज किमान 30 मिनिटे चालल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि मूडही चांगला राहतो.

योग, ध्यान, श्वसनाचे व्यायाम आणि सकारात्मक विचार या सवयी मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तज्ज्ञांच्या मते, ब्रेन डिटॉक्ससाठी कोणत्याही चमत्कारी उपायांवर अवलंबून राहण्यापेक्षा निरोगी जीवनशैली स्वीकारणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.