भरधाव बुलेटचा दुचाकीला धडक; रेमंड कर्मचाऱ्याचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यवतमाळ शहरातील दारव्हा रोडवरील देवगड डिलाईट हॉटेलसमोर भरधाव बुलेटने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने रेमंड कंपनीतील कर्मचाऱ्याचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. ही भीषण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या प्रकरणी बुलेट चालकाविरुद्ध लोहारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मृतकाचे नाव प्रदीपकुमार रामकृष्ण जारी असे आहे. ते सायंकाळी भाजीपाला खरेदी करून त्यांच्या ज्युपिटर दुचाकीने घरी परतत होते. देवगड डिलाईट हॉटेलसमोरील दुभाजकाजवळ घराकडे वळत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या बुलेट चालकाने निष्काळजीपणे दुचाकीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की प्रदीपकुमार जारी यांना चेहरा व कंबरेला गंभीर दुखापत झाली. उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर खासगी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तेथे दाखल न झाल्याने पुन्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी मृताचे भाऊ प्रमोद रामकृष्ण जारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित बुलेट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लोहारा पोलीस निरीक्षक रोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघातानंतर दारव्हा रोडवरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दर्डा नगर ते लोहारा हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून या मार्गावर अनेक हॉटेल्स व बार आहेत. तसेच, रस्ता ओलांडण्यासाठी विविध ठिकाणी अधिकृत नियोजन व सुरक्षा उपायांशिवाय मार्ग उपलब्ध करून देण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असून, वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.