डोंबिवलीत जिवंत मतदारांना मृत दाखवले, एसआयआरचा झोल; शिवसैनिकांनी केला भंडाफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक याद्या निर्दोष करण्यासाठी सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेत मोठा झोल सुरू असल्याची धक्कादायक बाब डोंबिवलीत उघडकीस आली आहे. डोंबिवलीतील दिप्ती अंधारी या ६२ वर्षीय ज्येष्ठ महिलेला मयत दाखवून त्यांचे नावच मतदार यादीतून कापण्यात आले आहे. रेणुका ठाणेकर यांनाही मयत घोषित करून त्यांचे नाव कापण्यात आले. शिवसैनिकांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला असून हा झोल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

दिप्ती राजीव अंधारी या डोंबिवली पूर्व येथे राहतात. त्यांनी पालिकेपासून लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. दिप्ती अंधारी या एसआयआरमध्ये नाव नोंदवण्यासाठी गेल्या असता तेथील अधिकाऱ्यांनी ही व्यक्ती मयत झाल्याचे सांगितल्याने त्यांना मोठा धक्काच बसला. मीच दिप्ती अंधारी आहे आणि मी जिवंत आहे, असे वारंवार सांगितल्यानंतरही अधिकारी ऐकायला तयार नसल्याने त्यांनी ही बाब पेंडसेनगरचे शाखाप्रमुख हेमंत गिमावकर आणि युवा शाखा अधिकारी अनुज मोरे यांना सांगितले. गिमावकर आणि मोरे यांनी तत्काळ शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर या सर्वांनी दिप्ती अंधारी यांना घेऊन विधानसभा १४३चे डोंबिवली मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धाव घेतली.

चौकशी करा.. अन्यथा आंदोलन करू

जिवंत मतदारांची नावे कोणत्या आधारे आणि कोणत्या प्रक्रियेनुसार वगळली याची सविस्तर चौकशी करावी आणि दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. ज्यांची नावे चुकीने वगळली आहेत ती पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करावीत अन्यथा शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा प्रमोद कांबळे, हेमंत गिमावकर आणि अनुज मोरे यांनी दिला.

डोंबिवली पश्चिमेतही जिवंत मतदाराला मयत दाखवले
डोंबिवली पश्चिम १४३ विधानसभा क्षेत्रात रेणुका मनोहर ठाणेकर या राहतात. एसआयआर करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी त्यांचेही नाव नोंदवून घेण्यास नकार दिला. मतदार यादीत तुम्ही मयत झाल्याचे दाखवले आहे, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगताच त्यांनाही धक्का बसला. उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे यांनी रेणुका ठाणेकर यांना अधिकाऱ्यांच्या पुढ्यात उभे केले तेव्हा त्यांची कागदपत्रे जमा करून सिस्टीममध्ये काही बदल करत त्यांचे नाव कसेबसे नोंदवून घेतले.

चूक झाली, पण आता दुरुस्त होणार नाही
एसआयआर राबवणाऱ्या अधिकाऱ्यांनी चूक मान्य केली. चूक झाली आहे पण ती आता दुरुस्त होणार नाही. याद्या अपडेट झाल्या की त्यानंतर सहा नंबरचा फॉर्म भरा, सगळे पुरावे जोडा नंतरच जे काही करायचे आहे ते करता येईल, अशी उडवाउडवीची उत्तरे या अधिकाऱ्यांनी गिमावकर, मोरे आणि कांबळे यांना दिली.