
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्यानजीक शुक्रवारी सायंकाळी लिक्विड अमोनिया वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, महाडच्या दिशेने जात असलेला सुमारे १५ मेट्रिक टन क्षमतेचा लिक्विड अमोनिया वाहून नेणारा टँकर बोगद्यानजीक डाव्या बाजूला पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच एमएआरजी (MARG) महाड युनिटचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
आप्पासाहेब गजबे, शीतल पाटील, सोमनाथ शेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन हायड्रा आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने पलटी झालेला टँकर सुरक्षितपणे उचलून रस्त्याच्या बाजूला हलविला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आली.
धोकादायक रसायनाची वाहतूक करणारा टँकर असल्याने प्रशासनाने घटनास्थळी आवश्यक ती खबरदारी घेत परिसर सुरक्षित ठेवला. वेळेत बचावकार्य झाल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून महामार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत.


























































