
बोगस मतदार वगळण्यासाठी मतदारांच्या घरोघरी जाऊन वस्तुस्थिती तपासून त्यानंतरच मतदार यादीत नाव नोंदणीसाठी केंद्र सरकारने एसआयआर मोहीम सुरू केली असली तरी या मोहिमेला दिव्यात सपशेल हरताळ फासण्यात आला आहे. घरोघरी जाऊन मतदार तपासणी करण्याऐवजी दिव्यात चक्क कॅम्प लावून मतदारांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत. असेच काम होणार असेल तर दिव्यातील ७० हजार बोगस मतदार तपासणार कसे, असा सवाल शिवसेनेने केला आहे.
एसआयआर प्रक्रियेचा मूळ उद्देश घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणे हा आहे. संबंधित मतदार त्या पत्त्यावर वास्तव्यास आहे का, स्थलांतरित झाला आहे का, त्याचा मृत्यू झाला आहे का, तसेच मतदार यादीतील नोंदी अचूक आहेत का याची खात्री घरोघरी जाऊन करणे अपेक्षित असते. मात्र दिवा शहरात निवडणूक अधिकाऱ्यांनी कॅम्प आयोजित करून नागरिकांनी तेथे येऊन फॉर्म भरावेत असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही एसआयआर प्रक्रिया आहे की केवळ मतदार पडताळणीचा फार्स उरकला जात आहे, असा सवाल शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे यांनी केला. दिवा शहरात ७० हजार बोगस मतदार असल्याचा आरोप करण्यात आला होता. जर बीएलओ घरोघरी जाणारच नसतील तर हे बोगस मतदार शोधणार कसे, याकडेही त्यांनी निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले आहे.
प्रक्रियेपासून मतदार वंचित राहण्याची भीती
अनेक ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कामानिमित्त बाहेर असणारे नोकरदार किंवा कॅम्पपर्यंत पोहोचू न शकणारे मतदार या एसआयआर प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅम्पमध्ये फॉर्म स्वीकारल्यानंतरही अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत का? आणि जर घरोघरी जाऊन पडताळणी होणारच नसेल तर या प्रक्रियेला स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन म्हणण्याचे औचित्य काय, असा सवालही अॅड. मुंडे यांनी केला आहे.





























































