
तलासरी – गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील महावितरणची वीज यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब उन्मळून पडले असून मुख्य वाहिन्यांवर झाडे पडल्याने दोन दिवसांपासून अनेक गावे अंधारात आहेत. तसेच याचा परिणाम पाणीपुरवठ्यावरही झाल्याने पाणीबाणीची परिस्थिती ओढवली आहे.
३५० प्रवाशांना जेवण
बोईसर-चिल्हार मार्गावर पावसाचे पाणी साचल्याने दिवसभर वाहतूक ठप्प होती. मात्र प्रवाशांचे झालेले प्रचंड हाल लक्षात घेऊन फुलाचापाडा येथील ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत पुरामुळे अडकलेल्या ३५० प्रवाशांना भोजनाची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले. दरम्यान नदीकाठच्या गावांना कोणतीही पूर्वसूचना न देता धामणी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आल्याने परिसरातील गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.


























































