
कल्याण शहरातील सिंडिकेट परिसरात असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले असून कार्यालयातील महत्त्वाची शासकीय कागदपत्रे, संगणक, फर्निचर तसेच अन्य साहित्य आगीत खाक झाले.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या अनेक फेऱ्यांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आगीत शासकीय कामकाजासाठी आवश्यक असलेली अनेक महत्त्वाची कागदपत्रे नष्ट झाल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस तपास करत आहेत.





























































