मेट्रो, रस्ते, दुकानं, इंटरनेट बंद केलं; पण पेपरफुटी थांबवू शकत नाहीत! राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने 18 मेट्रो स्थानकं पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तिखट शब्दांमध्ये हल्ला चढवला आहे. मेट्रो, रस्ते, दुकानं, इंटरनेट बंद केलं, पण पेपरफुटी थांबवू शकत नाहीत, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

मेट्रो बंद, रस्ते बंद, दुकानं बंद, इंटरनेट बंद, दाणापाणी बंद. आपल्या हक्कांची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध सरकारने ही क्रूर पाऊले उचलली आहेत. पण मोदीजी एक गोष्ट थांबवू शकले नाहीत, पेपरफुटी! अशी पोस्ट राहुल गांधी यांनी एक्स अकाऊंटवर केली आहे.

दिल्लीतील 18 मेट्रो स्थानकं बंद

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा धसका घेतलेल्या सरकारने दिल्लीतील 18 मेट्रो स्थानकं पुढील आदेशापर्यंत बंद कली आहेत. शनिवारी सकाळी 7.30 वाजेपासून लोक कल्याण मार्ग, पटेल चौक, राजीव चौक, केंद्रीय सचिवालय, जोरबाग, जनपथ, खान मार्केट, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंभा रोड, सुप्रीम कोर्ट, मंडी हाऊस, इंद्रप्रस्थ, सेवा तीर्थ, आयटीओ (ITO), दिल्ली गेट, शिवाजी स्टेडियम, झंडेवालान आणि नवी दिल्ली ही मेट्रो स्थानकं बंद राहणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास मंडी हाऊस, राजीव चौक आणि केंद्रीय सचिवालय या स्टेशनचे प्रवेशद्वार काही काळासाठी उघडण्यात आले होते, मात्र शनिवारी सकाळी 7.30 पासून पुन्हा बंद करण्यात आली.

सरकारने घेतला ‘कॉक्रोच’चा धसका; दिल्लीतील 18 मेट्रो स्थानकं पुढील आदेशापर्यंत बंद