CJP Protest Dharmendra Pradhan – अभिजीत दिपके यांना टायफॉइड झाल्याचे निदान, स्वत: व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह हजारो विद्यार्थी नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात लढा देत आहेत. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका सीजेपीने घेतली आहे. अशातच अभिजीत दिपके यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अभिजीत दिपके तापाने फणफणले असून त्यांना टायफॉइड झाल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत दिपके यांनी स्वत: ही माहिती दिली आहे.

गेल्या दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नाही. त्यामुळे मी रक्ताची चाचणी केली आणि त्याचे रिपोर्ट आले आहेत. मला टायफॉइड झाल्याचे निदान झाले आहे. माझ्यावर उपचार सुरू असून रोज सकाळी आणि संध्याकाळी आयव्ही लावण्यात येत आहे, अशी माहिती अभिजीत दिपके यांनी दिली.

देशभरात शांततापूर्ण आंदोलन सुरू आहेत. ही चळवळ तरुणांनी यशस्वी करून दाखवली, त्याबद्दल त्यांचे आभार. आपण असेच शांततापूर्ण आंदोलन करत राहिलो, तर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागेल, असेही ते म्हणाले.

टायफॉइड म्हणजे काय आणि तो कसा पसरतो?

टायफॉइड हा आजार साल्मोनेला टायफी नावाच्या जिवाणूंमुळे होतो. दूषित अन्न आणि अस्वच्छ पाणी प्राशन केल्याने किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने या आजाराचा प्रसार होतो. अस्वच्छ परिसर, रस्त्यावरील उघड्यावरील खाद्यपदार्थ आणि हात स्वच्छ न धुता अन्नग्रहण करणे, यांमुळे हा जिवाणू शरीरात प्रवेश करतो.

प्रमुख लक्षणे आणि धोके

  • संसर्ग झाल्यानंतर 1 ते 3 आठवड्यांत टायफॉइडची लक्षणे दिसू लागतात:
  • मुदतीचा आणि सतत चढणारा तीव्र ताप
  • तीव्र डोकेदुखी, अशक्तपणा आणि थकवा
  • भूक मंदावणे आणि पोटदुखी
  • उलट्या, जुलाब किंवा बद्धकोष्ठता
  • छातीवर किंवा पोटावर गुलाबी रंगाचे हलके पुरळ उठणे
  • योग्य वेळी प्रतिजैविके आणि योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यास आतड्यांना छिद्र पडणे, अंतर्गत रक्तस्राव किंवा ‘सेप्सिस’सारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.