
जूनअखेरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप होईल, असा दावा मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाने केला होता. मात्र जुलै महिना संपत आला तरी अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना स्कूल किट मिळालेले नाही. वह्या, रेनकोट, सँडल्स, स्कूल बॅग आदी वस्तू मुलांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याबद्दल आज शिक्षण समितीच्या सभेत विरोधकांनी प्रशासनाला चांगलाच जाब विचारला. स्कूल किटच्या वाटपास विलंब झाल्याचे शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी मान्य केले.
नगरसेविका कामरजहा मोईन यांनी याबाबतचा हरकतीचा मुद्दा उपस्थित करत पालिकेच्या शाळेत शिकणाऱया मुलांकडे भरपावसात रेनकोट, छत्री नसल्याकडे लक्ष वेधले. शिवसेना नगरसेवक अंकित प्रभू यांनी 2 लाख 98 हजार विद्यार्थी स्कूल किटपासून वंचित असल्याचे सांगितले. अंकित प्रभू म्हणाले, मुलांना छत्र्या, सँडल, युनिफॉर्म अद्याप मिळालेले नाहीत. पालिका ज्या 27 वस्तू देते, त्यावर मुलांचा अभ्यास होतो. जेम पोर्टलवर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही निश्चित वेळमर्यादा ठरवावी.
या चर्चेला उत्तर देताना, उपायुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर यांनी 31 जुलैपर्यंत सर्व वस्तूंचे वाटप पूर्ण करण्यावर भर दिला जाईल असे सांगितले. मुलांना देण्यात येणाऱया 27 वस्तूंच्या वाटपाला विलंब झाल्याची कबुली शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी दिली. मात्र प्राची जांभेकर यांनी सारवासारव केली.
शिवसेनेने प्रशासनाला विचारला जाब
शिक्षण अधिकाऱ्यांच्या या गोलमाल उत्तरावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. जेम पोर्टलमुळे लाखो रुपये वाचल्याचा दावा केला जातो. पण शालेय वस्तू न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई कशी करणार? वेंडरला दंड लावणार का, असा सवाल शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला.
z नगरसेवक प्रमोद सावंत यांनी विलंबामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याकडे लक्ष वेधले. आजमितीला 90 टक्के विद्यार्थ्यांना वस्तूंचे वाटप झालेले नाही ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिली.
z जेम पोर्टल प्रक्रिया आधी सुरू करायला हवी होती. दोन महिने झाले शाळा सुरू होऊन वस्तू दिलेल्या नाहीत. जर वेंडर वस्तूंचा पुरवठा करायला असमर्थ असेल तर मुलांसाठी पर्यायी व्यवस्था काय केली, यांची विचारणा नगरसेविका सोनाली साबे यांनी केली. ऑगस्टमध्ये परीक्षा होणार आहेत. मुलांना पुस्तके मिळाली नाही तर अभ्यास कधी करणार, असा प्रश्न नगरसेविका पूजा महाडेश्वर यांनी विचारला.

























































