अभंगापासून आधुनिक मराठी गीतांपर्यंतचा सुरेल प्रवास उलगडणार, मंगळवारी प्रभादेवीत ‘अभंग ते आधुनिक’ सांगीतिक कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संतवाणीपासून आधुनिक मराठी गीतांपर्यंतच्या मराठी संगीताचा सुरेल प्रवास उलगडणारा ‘अभंग ते आधुनिक’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम येत्या मंगळवारी रात्री 8.30 वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे सादर होणार आहे. अभंग, संतवाणी आणि मराठी संगीतपरंपरेतील विविध प्रवाहांचा आधुनिक मराठी गीतांशी सुरेल संवाद या कार्यक्रमातून साधला जाणार आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा कलात्मक संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात नचिकेत देसाई, केतकी भावे-जोशी आणि धनश्री देशपांडे आपल्या सुमधुर आवाजातून विविध रचनांचे सादरीकरण करतील. डॉ. समीरा गुजर-जोशी सुसंवाद साधणार आहेत. विनय चेऊलकर, अक्षय कावळे, विजय तांबे, प्रभाकर मोसमकर, मयूरेश शर्लेकर आणि जयंता बगाडे हे वादक साथसंगत करतील. कार्यक्रमाचे संयोजन ‘स्वरवंती क्रिएशन्स’ यांचे असून ध्वनी संयोजन प्रतीक पराडकर यांचे आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून संगीतप्रेमींनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.