
रुग्णालयातील कामगारांना भेडसावणाऱया समस्यांना वाचा फोडण्यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयावर धडक दिली. सेनेने वैद्यकीय अधीक्षकांची भेट घेऊन रुग्णालयातील अधिकाऱयांचा मनमानी कारभार व कामगारांच्या समस्यांचा पाढा वाचला. अखेर वैद्यकीय अधिकाऱयांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे रुग्णालयातील कामगारांचे प्रश्न लवकरच सुटणार आहे.
शताब्दी रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी नवज्योत सांडू हे मनमानी कारभार करत असून कामगारांची पिळवणूक करत आहेत. तसेच कामगारांच्या कामात जाणूनबुजून अडचणी निर्माण करत आहे. त्यांच्या या वर्तनामुळे कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. अधिकाऱयाच्या या मनमानी कारभाराविरोधात आज संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी शिष्टमंडळासोबत रुग्णालयावर धडक देत वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान संघटनेने सांडू यांचा तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्या बदलीची मागणी केली. यावर डॉ. गुप्ता सकारात्मक प्रतिसाद देत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विभागप्रमुख मीनल चौकीकर, उपाध्यक्षा रंजना नेवाळकर, चिटणीस संजय वाघ, अजय राऊत, महेश गुरव, रुग्णालय प्रतिनिधी फकिरा रहाटळ, आशा क्षीरसागर आदी उपस्थित होते.


























































